जनतेचा पैसा उधळू नका!’ फडणवीसांचा थेट दणका, भाजप नेत्यावर इनोव्हा खरेदीचा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सत्ताधाऱ्यांकडून नवीन महागड्या गाड्यांच्या खरेदीसाठी चाललेली पैशांची उधळपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रोखली गेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर, भाजपच्या सभागृह नेत्यांना अखेर हा वादग्रस्त प्रस्ताव मागे घ्यावा लागला आहे. यामुळे पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनावर मोठी नामुष्की ओढवली आहे.

BMC गाड्यांचा वाद;


मुंबई महानगरपालिकेत (BMC) पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी नव्या आलिशान गाड्या खरेदी करण्याच्या वादावर अखेर मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम लावला आहे. "मुंबईकरांच्या पैशांची अशी उधळपट्टी अजिबात खपवून घेतली जाणार नाही," अशा कडक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रशासनाला थेट आदेश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या तीव्र नाराजीनंतर भाजपचे महापालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर (Ganesh Khankar) यांना इनोव्हा गाड्या खरेदीचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की आली आहे.

मुंबई महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच (फेब्रुवारी २०२६ मध्ये) महापौर, उपमहापौर आणि विविध समिती अध्यक्षांसाठी सुमारे २ कोटी १६ लाख रुपये खर्चून १३ नवीन वाहने खरेदी केली होती. यामध्ये स्कॉर्पिओ-एन (Scorpio-N) आणि इनोव्हा हायक्रॉस (Innova Hycross) या गाड्यांचा समावेश होता.

परंतु, या गाड्यांमध्ये प्रवास करताना 'पाठ दुखते' आणि 'झटके बसतात' अशी अजब तक्रार काही पदाधिकाऱ्यांनी केली. यावर उपाय म्हणून तब्बल १.५ कोटी रुपये खर्चून ६ नवीन आलिशान इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव पालिकेच्या अजेंड्यावर आणण्यात आला होता.

मुंबईत आधीच खड्डे, पाणी आणि इतर पायाभूत सुविधांचे प्रश्न गंभीर असताना, लोकप्रतिनिधी स्वतःच्या आरामासाठी जनतेच्या करातील पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी (काँग्रेस आणि शिवसेना UBT) यावर जोरदार आक्षेप घेतला.

हा वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी ‘जनतेचा पैसा उधळू नका!’ असे ठणकावून सांगत हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे सत्ताधारी भाजप बॅकफूटवर आली आणि गणेश खणकर यांना प्रस्ताव गुंडाळावा लागला.

हा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर भाजप नेते गणेश खणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सारवासारव केली. "मी वैयक्तिकरित्या कोणत्याही विशिष्ट गाडीची मागणी केली नव्हती. महापालिकेत सर्वांना एकसमान (स्कॉर्पिओ श्रेणीतील) गाड्या दिल्या जाव्यात, जेणेकरून प्रशासनाचा कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही," असे स्पष्टीकरण खणकर यांनी दिले.


Inline Article Ad 728x90