धुळ्यात लक्झरी बस अडवली अन् आत सापडला तब्बल १६ लाखांचा खवा! FDA च्या कारवाईत मोठा साठा जप्त

धुळ्यात अन्न व औषध प्रशासनाने लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येणारा तब्बल ५,३८५ किलो खवा जप्त केला आहे. या साठ्याची किंमत १६ लाख ५२ हजार १०० रुपये असून, भेसळीच्या संशयावरून १३ प्रकारच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Tukaram_Mundhe

धुळे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात तपासणी मोहीम तीव्र केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात चार ट्रक पनीर आणि खवा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता धुळ्यातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या एका लक्झरी बसमध्ये तब्बल १६ लाख ५२ हजार रुपयांचा खवा आढळून आला आहे. भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने हा संपूर्ण साठा जप्त केला आहे.

लक्झरी बसमध्ये सापडला तब्बल ५,३८५ किलो खवा

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात विविध वाहनांची तपासणी सुरू आहे. याचदरम्यान अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या अशोक लेलँड वेलकम लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणात माव्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आणि धुळे तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोराणे हद्दीतील साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ संबंधित बस थांबवली. बसची तपासणी केली असता विविध कंपन्यांचा तब्बल ५,३८५ किलो मावा आढळून आला. या साठ्याची एकूण किंमत १६ लाख ५२ हजार १०० रुपये असल्याचे समोर आले.

१३ प्रकारच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी

कारवाईनंतर संबंधित बस टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आली. या ठिकाणी जप्त केलेल्या साठ्यातील विविध १३ प्रकारच्या उत्पादनांचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये ब्रजनिधी, गणेशा, नंदी, श्री ग्वाल, श्री गोकुळ, श्री गोपाल, कृष्णा आणि मीरा या नावांनी विकल्या जाणाऱ्या विविध हलवा, स्वीट आणि डेझर्ट उत्पादनांचा समावेश आहे.

भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला असून, सर्व नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.

प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई

जप्त केलेला खवा भेसळयुक्त आहे की नाही, हे प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. अहवालाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Inline Article Ad 728x90