मित्राच्या हत्येनंतर 20 दिवस झोप उडाली! मृत मित्र स्वप्नात येऊ लागल्याने आरोपी स्वतःच पोहोचला पोलिसांत
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरात किरकोळ वादातून प्रभू करकडे याने मित्र विशाल कदम याची हत्या केली. त्यानंतर घरमालक संदीप म्हात्रे याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून खाडीकिनारी निर्जन ठिकाणी फेकून दिला. मात्र, हत्येनंतर तब्बल 20 दिवस मृत मित्र स्वप्नात येत असल्याने आरोपीला झोप लागत नव्हती. अखेर मानसिक अस्वस्थतेतून त्याने स्वतःच क्राईम ब्रँचकडे धाव घेत गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी प्रभू करकडे आणि संदीप म्हात्रे या दोघांना अटक केली आहे.

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पश्चिमेच्या मोठागाव परिसरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ वादातून प्रभू करकडे याने आपला मित्र विशाल कदम याची हत्या केली. हत्येनंतर घरमालक संदीप म्हात्रे याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून खाडीकिनारी निर्जन ठिकाणी फेकून दिला. मात्र, या घटनेनंतर आरोपी प्रभू करकडे याला तब्बल 20 दिवस झोप लागली नाही. मृत मित्र वारंवार स्वप्नात येत असल्याने मानसिक अस्वस्थ झालेल्या आरोपीने अखेर स्वतःहून क्राईम ब्रँच पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर या हत्येचा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी प्रभू करकडे आणि घरमालक संदीप म्हात्रे या दोघांना अटक केली आहे.
दारूच्या नशेत मित्रांमध्ये झाला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव परिसरात विशाल कदम आणि प्रभू करकडे हे दोघे मित्र एका घरात दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. दारू पित असताना दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हळूहळू जोरदार भांडणात झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात प्रभू करकडे याने विशाल कदम याची हत्या केली.
घरमालकाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट
आपल्या हातून मित्राचा खून झाल्याचे लक्षात येताच प्रभू करकडे घाबरला. त्याने घडलेला संपूर्ण प्रकार घरमालक संदीप म्हात्रे याला सांगितला. त्यावेळी संदीप म्हात्रे याने, 'तुझे अजून लग्नही झालेले नाही, तुझे आयुष्य बरबाद होईल,' असे सांगत या घटनेची कुठेही वाच्यता करू नको, असा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर दोघांनी मिळून विशाल कदम याचा मृतदेह एका गोणीत भरला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खाडीकिनारी असलेल्या निर्जन ठिकाणी नेऊन फेकून दिला. या प्रकारामुळे विशालच्या हत्येचे गूढ निर्माण झाले होते.
20 दिवस मृत मित्र स्वप्नात येत असल्याने आरोपी पोलिसांत
हत्या केल्यानंतर प्रभू करकडे मात्र मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला होता. तब्बल 20 दिवस त्याला व्यवस्थित झोप लागत नव्हती. मृत मित्र विशाल कदम वारंवार स्वप्नात येत असल्याने तो घाबरला होता. अखेर या मानसिक त्रासामुळे त्याने स्वतःहून क्राईम ब्रँच पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
दोन्ही आरोपींना अटक
प्रभू करकडे याने दिलेल्या माहितीच्या आधारे क्राईम ब्रँच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी विष्णूनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी विशाल कदम हत्या प्रकरणी मुख्य आरोपी प्रभू करकडे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याच्या आरोपावरून घरमालक संदीप म्हात्रे या दोघांना अटक केली आहे.
दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याच्या या घटनेमुळे डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर 20 दिवसांनी मृत मित्र स्वप्नात येत असल्याने आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.