ज्यांच्यावर आरोप, त्यांच्याकडूनच पूर्णेकर कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी! मिनाक्षी शिंदेंच्या पत्राने ठाण्यात खळबळ
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. राम पूर्णेकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसह निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. राजकीय विरोधकांकडून या प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रातून केला आहे.

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे यांच्यावर आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, खुद्द मिनाक्षी शिंदे यांनी राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून देण्याची मागणी केली आहे.
मिनाक्षी शिंदे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनानंतर ठाण्यातील विविध विरोधी पक्षांचे नेते या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, आमदार अनिल परब, माजी खासदार राजन विचारे यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांकडून या प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
विरोधकांवर गंभीर आरोप
विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे. समाजमाध्यमांवर खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असून, जनआंदोलनांच्या माध्यमातून आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
गेल्या चार-पाच दिवसांतील राजकीय वक्तव्यांमुळे ठाण्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. राजकीय विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंता
दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर आणि त्यांचे कुटुंबीय सध्या दुःखातून जात आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत विरोधकांकडून या कुटुंबाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
केवळ राजकीय स्वार्थासाठी काही व्यक्तींकडून पूर्णेकर कुटुंबीयांच्या बाबतीत घातपात किंवा अनुचित प्रकार घडवून आणला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीयांच्या तसेच त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची मागणी
मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात खालील व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्याची किंवा सध्याच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी केली आहे.
- राम पूर्णेकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय
- दिनेश पवार
- अखिलेश पाल
- प्रशांत मोटे
- आनंद भोईर
- किसान तट्टे
- विवेक पांढरे
या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, मिनाक्षी शिंदे यांच्या या पत्रामुळे प्रकरणाला आणखी एक राजकीय वळण मिळाले आहे. आता पोलीस प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.