'आम्ही कितीही राजकारणी असलो तरी...' एकनाथ शिंदेंचं थेट विधान; त्र्यंबकेश्वरमधून मोठ्या घोषणा!
त्र्यंबकेश्वर येथे आयोजित आनंद कुंभ संत संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असल्याचे विधान केले. यावेळी त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी मदत, १३ आखाड्यांतील संतांच्या भोजनाची व्यवस्था आणि कुंभमेळ्याच्या विकासकामांबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या.

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर येथे आयोजित आनंद कुंभ संत संमेलनात मोठे विधान केले आहे. 'आम्ही कितीही राजकारणी असलो, तरी राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्त्वाची आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी धर्म आणि संस्कृतीचा पाया मजबूत असला पाहिजे,' असे शिंदे यांनी म्हटले. या संमेलनात त्यांनी १३ आखाड्यांतील संत-महंतांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले.
संतांनी महाराष्ट्राला माणुसकी, समता आणि समाजसेवेची शिकवण दिली आहे. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजकारण आणि राष्ट्रसेवेसाठी असले पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.
'दुष्काळ आहे, मग कुंभमेळा कशाला?' विरोधकांना शिंदेंचं प्रत्युत्तर
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाही शिंदे यांनी उत्तर दिले. कुंभमेळा हे महाराष्ट्राचे सौभाग्य असून, त्याकडे केवळ धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता पर्यटन, व्यापार आणि रोजगारनिर्मितीची संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्याच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना करणार मदत
दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी शिवसेना मदत करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिंदे यांनी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या १३ आखाड्यांतील संत-महंतांच्या भोजनाची संपूर्ण व्यवस्था शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी निधीचे आश्वासन
त्र्यंबकेश्वर येथील प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून देणे, उपजिल्हा रुग्णालय उभारणे आणि कुंभमेळ्याच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या व्यावसायिकांना मदत करण्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले. तसेच भूसंपादनामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कुंभमेळ्याची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.