दिल्लीतील लाठीमार योग्यच"; आंदोलनावर फडणवीसांची स्पष्ट भूमिका

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला पोलिसांचा लाठीमार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी तो शांततेत आणि कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलन नेतृत्वविहीन असल्याने काही स्वार्थी प्रवृत्ती आणि राजकीय पक्ष त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, हिंसाचार आणि अराजकता निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी संयमाने कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस Image

मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठीमार हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दिल्लीतील आंदोलन आणि त्यावर झालेल्या पोलिस कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र आंदोलन करताना संविधानाने दिलेले अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. परवानगी घेऊन आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसाचार करणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. अशा वेळी पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी लागते.

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी हे आंदोलन नेतृत्वविहीन असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये काही स्वार्थी प्रवृत्ती घुसून स्वतःचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान पोलिसांच्या वाहनांची तोडफोड, दगडफेक आणि इतर हिंसक घटना घडल्याचे सांगत त्यांनी पोलिसांनी मोठा संयम दाखवल्याचेही नमूद केले.

"कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीमार करणे आवडत नाही. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असेल आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत असेल, तर पोलिसांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागते," असे फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांवर आरोप करणे योग्य नसल्याचेही स्पष्ट केले. अनेक विद्यार्थी चांगल्या हेतूने आंदोलनात सहभागी झाले असतील. मात्र काही लोकांचा नीट परीक्षेशी कोणताही संबंध नसून ते आंदोलनाचा वापर अराजकता निर्माण करण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही राजकीय पक्षही या आंदोलनातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शांततापूर्ण आंदोलनाला सरकारचा कोणताही विरोध नाही. मात्र कायदा हातात घेऊन हिंसाचार करणाऱ्यांवर आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले

Inline Article Ad 728x90