इम्रान खानला हायकोर्टाचा दिलासा, पण आंदोलनावरून न्यायालयाने चांगलेच सुनावले
SIR आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अभिनेता इम्रान खान अडचणीत आला होता. अमेरिकेचे नागरिकत्व आणि OCI कार्डधारक असल्याने त्याला 7 डिसेंबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने नोटीसवरील स्थगिती कायम ठेवत अभिनेत्याला मोठा दिलासा दिला आहे. मात्र, आंदोलनातील सहभागावरून न्यायालयाने त्याला चांगलेच सुनावले असून भविष्यात अशा आंदोलनांमध्ये सहभागी न होण्याचे हमीपत्र आणि बिनशर्त माफी मागण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

मुंबई : SIR (Special Intensive Revision) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनामुळे अभिनेता इम्रान खान चर्चेत आला आहे. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला 7 डिसेंबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीविरोधात इम्रान खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता या प्रकरणात न्यायालयाने अभिनेत्याला मोठा दिलासा दिला असून Leave India Notice वरील स्थगिती कायम ठेवली आहे. मात्र, याचवेळी न्यायालयाने त्याच्या आंदोलनातील सहभागावरून कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस का बजावली?
इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व असून तो OCI कार्डधारक आहे. मुंबईतील SIR विरोधी आंदोलनात त्याने सहभाग घेतल्यामुळे त्याला भारत सोडण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीनुसार त्याला 7 डिसेंबरपर्यंत देश सोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, या कारवाईला आव्हान देत अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
'तुम्ही नेमके आंदोलनात का सहभागी झालात?' न्यायालयाचा सवाल
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने इम्रान खानच्या आंदोलनातील सहभागावर प्रश्न उपस्थित केले. SIR आंदोलनाशी तुमचा नेमका काय संबंध आहे? तुम्ही तिथे का गेला होतात? भारताचे नागरिक आणि OCI कार्डधारक यांचे अधिकार वेगवेगळे आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच, तुमच्या व्यवसायासंदर्भातील माहितीत तुम्ही नोकरीच्या शोधात असल्याचे नमूद केले आहे. तुम्हाला नोकरी मिळाली आहे का, असा सवालही न्यायालयाने केला. त्यावर सध्या आमच्याकडे कोणताही चित्रपट नाही. माझे बालपण भारतातच गेले आहे, अशी माहिती इम्रान खानच्या वकिलांनी न्यायालयात दिली.
'तुम्ही सेलिब्रिटी आहात, मग आंदोलनात का गेलात?'
न्यायालयाने इम्रान खानच्या आंदोलनातील सहभागाबाबत आणखी काही प्रश्न उपस्थित केले. तुम्ही सेलिब्रिटी आहात. जर तुम्हाला आंदोलनात सहभागी होण्यामध्ये रस नव्हता, तर तुम्ही तिथे गेलातच का? तुम्ही चित्रपटासाठी किंवा प्रमोशनसाठी आंदोलनात सहभागी झाला होता का? अशी विचारणा न्यायालयाने केली.
तसेच, तुम्ही भारतीय नागरिक नाही. त्यामुळे भारतीय नागरिकांप्रमाणे वागू शकत नाही, असेही न्यायालयाने सुनावले. SIR प्रक्रियेमुळे तुम्हाला थेट कोणताही फरक पडत नाही, मग तुम्ही या आंदोलनात सहभागी होण्याचे कारण काय, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
न्यायालयाची अट; बिनशर्त माफी आणि हमीपत्र द्यावे लागणार?
सुनावणीदरम्यान न्यायालयाने इम्रान खानला OCI कार्डधारक म्हणून भारतात राहायचे असल्यास काही अटींचे पालन करावे लागेल, असे स्पष्ट केले. यापुढे अशा कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही तसेच इतरांनाही अशा आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणार नाही, असे लेखी हमीपत्र (Undertaking) द्यावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले.
याशिवाय, या प्रकरणात बिनशर्त माफी मागण्याचीही आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. एवढी वर्षे भारतात वास्तव्यास असताना तुम्ही भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज का केला नाही, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
Leave India Notice वरील स्थगिती कायम
या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने इम्रान खानला तात्पुरता दिलासा देत Leave India Notice वरील स्थगिती कायम ठेवली आहे. त्यामुळे त्याला भारत सोडण्याच्या नोटिशीपासून तूर्तास संरक्षण मिळाले आहे. मात्र, OCI कार्डधारक म्हणून भारतात वास्तव्यास असताना लागू असलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सुनावणीदरम्यान अधोरेखित केले.
या प्रकरणातील पुढील न्यायालयीन कार्यवाही आणि अभिनेत्याच्या हमीपत्राबाबत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.