अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा भारतीय बाजाराला फायदा! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1,561 अंकांनी वधारून 78,862 वर, तर निफ्टी 457 अंकांच्या वाढीसह 24,419 अंकांवर बंद झाला. बीएसईवरील कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 500 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात तब्बल 7.7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि जागतिक राजकीय घडामोडींचा बाजाराला फायदा झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Stock_Market

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक तेजी पाहायला मिळाली. मुंबईतील दलाल स्ट्रीटवर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी उसळी घेतली. या तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 500 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. विशेष म्हणजे, आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 7.7 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.

सेन्सेक्स 1561 अंकांनी वधारला, निफ्टीचीही मोठी झेप

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे वातावरण होते. मात्र, आज सलग सहाव्या दिवशी बाजारात तेजीचे चित्र पाहायला मिळाले. व्यवहारादरम्यान दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये जवळपास 2,000 अंकांची वाढ झाली होती, तर निफ्टीनेही 600 अंकांची उसळी घेतली होती.

अखेर दिवसअखेर सेन्सेक्स 1,561 अंकांच्या वाढीसह 78,862 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 457 अंकांनी वधारून 24,419 अंकांच्या पातळीवर स्थिरावला.

बँकिंग, फायनान्स, ऑटोमोबाईल, एव्हिएशन आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली.

शेअर बाजारात तेजी येण्यामागची कारणं काय?

भारतीय शेअर बाजारातील तेजीमागे अनेक जागतिक घडामोडी कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण यांचा भारतीय बाजाराला फायदा झाला.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) पुन्हा खरेदीचा जोर वाढवल्याने भारतीय शेअर बाजाराला मोठा आधार मिळाला. कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक मानली जात आहे.

बाजारातील तेजीबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं?

भारतीय शेअर बाजारातील या तेजीबाबत बाजार विश्लेषक अभिजीत फडणीस यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण ही गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक बाब असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, कच्च्या तेलाचे दर यापूर्वी 115 डॉलरपर्यंत पोहोचले होते. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांत हे दर घसरून 94 ते 95 डॉलरच्या आसपास आले आहेत. तेलाच्या किमतीतील ही घसरण भारतीय बाजारासाठी दिलासादायक ठरली आहे.

अमेरिकेतील राजकीय घडामोडींमुळे इराणवर संभाव्य लष्करी कारवाईची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे जागतिक बाजारात साशंकतेचे वातावरण होते. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्षासोबत जुळवून घेण्याची भूमिका मांडल्याने बाजारातील वातावरण सकारात्मक झाल्याचे फडणीस यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांच्या भूमिकेवर बाजाराची नजर

अभिजीत फडणीस यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली नरमाईची भूमिका कायम ठेवली तर भारतीय गुंतवणूकदारांसाठी ही सकारात्मक बाब ठरू शकते. मात्र, त्यांनी इराणविरोधात लष्करी कारवाईचा निर्णय घेतल्यास जागतिक बाजारातील सध्याची तेजी तात्पुरती ठरू शकते.

त्यामुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील घडामोडी यांचा भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बाब

शेअर बाजारातील आजच्या ऐतिहासिक तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असली, तरी जागतिक राजकीय परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या दरांमधील चढ-उतार याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Inline Article Ad 728x90