राष्ट्रवादीच्या कोअर कमिटी बैठकीत पार्थ पवारांचा मोठा निर्णय! झिशान सिद्दीकी अन् उमेश पाटील यांची नियुक्ती कायम; सहा महिन्यांचा अल्टिमेटम?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कोअर कमिटी बैठकीत झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्याची भूमिका घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पार्थ पवार यांनी सहा महिन्यांनंतर कामाचे मूल्यमापन करण्याचे सांगितल्याचे समजते. दिवाळीनंतर आमदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, आज मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पक्षातील नियुक्त्यांवरून सुरू असलेली नाराजी, अंतर्गत मतभेद आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम!
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईतील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली होती. पार्थ पवार यांनी झिशान सिद्दीकी यांची आणि उमेश पाटील यांची पक्षातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली होती. मात्र, या नियुक्त्या करताना कोअर कमिटीला विश्वासात घेतले नसल्याचा आक्षेप काही नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर आली होती.
यामुळे या नियुक्त्यांवर फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आजच्या बैठकीत दोन्ही नियुक्त्या कायम ठेवण्याची भूमिका पक्षाने घेतल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांनी दोघांनाही पुढील सहा महिने काम करण्याची संधी देण्यात येईल, असे सांगितले. या कालावधीत त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती आहे.
पार्थ पवारांनी दिला कोअर कमिटीला शब्द?
या बैठकीत पक्षातील अंतर्गत नाराजी आणि निर्णयप्रक्रियेवरही चर्चा झाल्याचे समजते. यापुढे महत्त्वाचे निर्णय घेताना कोअर कमिटीच्या सदस्यांना विश्वासात घेतले जाईल, असा शब्द पार्थ पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र, पक्षातील अंतर्गत वादावर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही.
अजित पवारांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरही चर्चा
मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पार पडलेली ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीत अजित पवार यांच्या मृत्यूशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सीआयडी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, अशी मागणी करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतल्याचे समजते.
दिवाळीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आमदार
दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीत अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणातील सीआयडी चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी संबंधित काही तक्रारीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडल्या जाण्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग; पुढील निर्णयांकडे लक्ष
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सातत्याने बैठका आणि संघटनात्मक घडामोडी सुरू आहेत. पक्षातील नियुक्त्या, अंतर्गत नाराजी, नेतृत्व आणि आगामी राजकीय भूमिका या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.
आजच्या कोअर कमिटी बैठकीत पार्थ पवार यांनी सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघटनात्मक आणि राजकीय निर्णय कोणत्या दिशेने जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.