जळगावच्या राजकारणात खळबळ! गिरीश महाजन-खडसे वाद पुन्हा पेटला, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

जळगावच्या राजकारणात पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील जुना संघर्ष चर्चेत आला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि भाजप नेते विजय चौधरी यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Girish Mahajan and Vijay Chaudhari Image

जळगाव : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय आहे. दोन्ही नेत्यांमधील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. आता पुन्हा एकदा महाजन-खडसे वादाला नवे वळण मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांची भाजपमधील वरिष्ठ नेत्यांशी वाढत असलेली जवळीक चर्चेत आहे. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी "राजकारणात एका टप्प्यावर थांबून नव्या पिढीला संधी दिली पाहिजे," असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला होता.

याच पार्श्वभूमीवर खडसे कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा करत एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे.

कथित ऑडिओ क्लिपवरून वाद

भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि एका मंत्र्यांमधील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे. या क्लिपची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, जळगावसह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला. "गटाराचे झाकण उघडल्यानंतर जशी घाण बाहेर येते, तशीच भाषा या संभाषणातून समोर येत आहे," अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

महिलांबाबत वक्तव्यांवरून टीका

रोहिणी खडसे यांनी आरोप केला की, भारतीय संस्कृती आणि सभ्यतेबाबत बोलणाऱ्या पक्षातील नेत्यांकडून अशी भाषा वापरली जाणे दुर्दैवी आहे. इतर पक्षातील महिलांबरोबरच स्वतःच्या पक्षातील महिलांबाबतही अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याचा त्यांनी आरोप केला.

भाजपमध्ये काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी याबाबत सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

विजय चौधरींवर कारवाईची मागणी

सोशल मीडियावर आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाते, मग राजकीय नेत्यांच्या बाबतीतही कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या. संबंधित व्यक्तीचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

"वेगवेगळ्या पक्षात असलो तरी काम आपापल्या पक्षासाठी"

दरम्यान, खडसे कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असल्याबाबत रोहिणी खडसे यांनी स्पष्टीकरण दिले. रक्षा खडसे आणि आपण वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी, त्या त्यांच्या पक्षाचे काम करत आहेत आणि आपण आपल्या पक्षासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक कुटुंबांमध्ये अशी परिस्थिती आहे. एकाच कुटुंबातील काही सदस्य वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करत असतात. त्यामुळे हा केवळ राजकीय विचारांचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. आता या प्रकरणावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90