जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य; समुद्राने टनभर प्लास्टिक पुन्हा किनाऱ्यावर फेकले

मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उधाणामुळे जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, थर्माकोल आणि इतर कचरा वाहून आला आहे. नाल्यांमधून व मिठी नदीतून आलेल्या कचऱ्यामुळे किनाऱ्याची अवस्था बिकट झाली असून पालिकेकडून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. हाय टाईडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेचीही खबरदारी घेतली आहे.

जुहू चौपाटीव Image

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जुहू चौपाटीवर सध्या मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे प्लास्टिक, थर्माकोल, लाकूड आणि इतर घाण किनाऱ्यावर आली आहे. त्यामुळे संपूर्ण चौपाटीचे चित्र बदलले असून नागरिक आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहरातील नाल्यांमधील कचरा मिठी नदीमार्गे समुद्रात गेला. मात्र, समुद्राला भरती आल्यानंतर तोच कचरा पुन्हा लाटांसोबत जुहू चौपाटीवर येऊन साचला. त्यामुळे किनाऱ्यावर सर्वत्र प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग दिसत आहेत.

या कचऱ्यामुळे पर्यटकांना फिरणे कठीण झाले आहे. अनेकांना प्लास्टिकच्या ढिगाऱ्यांमधून वाट काढावी लागत आहे. काही ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिकांनाही त्रास होत आहे. नागरिकांनी कचरा वेळेवर हटवला जात नसल्याची तक्रार केली आहे.

जुहू चौपाटीची ही अवस्था सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले असून, पर्यावरणप्रेमींनी समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस आणि हाय टाईडचा इशारा लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी चौपाटीवर बॅरिकेड्स लावले आहेत. तसेच जीवरक्षक २४ तास तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेकडून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू असून, दररोज मोठ्या प्रमाणात कचरा हटवण्याचे काम केले जात आहे. मात्र, ही समस्या कायमची सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Inline Article Ad 728x90