केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; सिया गोयलच्या भावाला १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस
आरोपी सिया गोयलच्या बचावासाठी पुढे आलेल्या वकिलांबाबत आक्षेप घेत साहिल गोयलने भूमिका स्पष्ट केली; त्यानंतर कायदेशीर संघर्ष तीव्र.
Sakshi Megha Prabhuपुणे : राज्यभर चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल याला तब्बल १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही नोटीस अॅड.आशुतोष श्रीवास्तव यांनी पाठवली असून, साहिल गोयलने सार्वजनिकरित्या केलेल्या विधानांमुळे त्यांची प्रतिमा आणि व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलची बाजू मांडण्यासाठी अॅड.आशुतोष श्रीवास्तव पुढे आले होते. मात्र, सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने माध्यमांसमोर येत आपल्या कुटुंबाने अॅड.आशुतोष श्रीवास्तव यांची नियुक्ती केलेली नसल्याचा दावा केला. तसेच, त्यांच्या कुटुंबाचा संबंधित वकिलांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या वक्तव्यांनंतर प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.
अॅड.आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलच्या विधानांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये सार्वजनिकरित्या माफी मागण्याची आणि १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधात पोलिसांकडून विविध पुरावे गोळा केले जात आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या घटनेपूर्वी आरोपींनी लोहगड परिसराची पाहणी केली होती आणि गुन्ह्याचे नियोजन केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
१८ जून रोजी पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ला परिसरात संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात असले तरी, पुढील तपासात हा नियोजनबद्ध कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, सध्या या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे.