केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत; चेतन-रितेशच्या चॅटमध्ये नेमकं काय दडलं?

लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. रितेश हिंगे याला हत्येच्या कटाची माहिती असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं असून, चेतन चौधरीसोबतच्या डिलीट केलेल्या WhatsApp चॅटमुळे तपासाला नवं वळण मिळालं आहे. हत्येच्या दिवशी रितेशला लोहगडावर येण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र त्याने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.

Ritesh Hinge

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यानंतर आता या प्रकरणात रितेश हिंगे याला अटक करण्यात आली आहे. मात्र, रितेशची या हत्याकांडात नेमकी भूमिका काय होती? याचा तपास सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

डिलीट केलेल्या चॅटमुळे तपासाला नवं वळण

पोलिसांच्या तपासानुसार, रितेश हिंगे आणि मुख्य आरोपी चेतन चौधरी यांच्यात WhatsApp वर संभाषण झालं होतं. हे संभाषण रितेशने डिलीट केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी हे चॅट रिकव्हर केल्यानंतर त्यातून हत्येच्या कटासंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाल्याचा संशय आहे.

याच पुराव्यांच्या आधारे रितेशला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

हत्येच्या दिवशी रितेशला लोहगडावर बोलावलं होतं?

18 जून रोजी केतन अग्रवालचा लोहगड किल्ल्यावर मृत्यू झाला. याच दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी रितेशलाही लोहगडावर येण्यास सांगितल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला.

यामुळे आता रितेशला हत्येच्या कटाची आधीपासून माहिती होती का? आणि त्याला लोहगडावर का बोलावण्यात आलं होतं? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत.

हत्येनंतरही आरोपींचा रितेशशी संपर्क

केतनच्या मृत्यूनंतरही चेतन आणि सिया यांचा रितेशशी संपर्क असल्याचं तपासात समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रितेशला या संपूर्ण प्रकरणाची किती माहिती होती आणि त्याची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

रितेश हिंगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नेमकं काय आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरण?

पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र, तपास पुढे सरकत असताना पोलिसांना या मृत्यूमागे कट असल्याचा संशय आला.

तपासादरम्यान केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या आरोपानुसार, दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचला होता.

इतकंच नाही, तर 18 जूनच्या काही दिवस आधीही केतनला किल्ल्यावरून ढकलून देण्याचा प्रयत्न झाला होता, असा दावा तपासात करण्यात आला आहे. त्यानंतर 18 जून रोजी पुन्हा केतनला लोहगडावरील उंच ठिकाणी नेण्यात आलं आणि त्याला खाली ढकलण्यात आल्याचा आरोप आहे.

आता या प्रकरणात रितेश हिंगेच्या अटकेनंतर तपासाला आणखी एक नवं वळण मिळालं आहे. चेतन आणि रितेशच्या संभाषणातून नेमकं काय समोर आलं? रितेशला हत्येच्या कटाची माहिती होती का? आणि हत्येच्या दिवशी त्याला लोहगडावर का बोलावण्यात आलं होतं? या प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहेत.

Inline Article Ad 728x90