"कुणबी प्रमाणपत्र घेऊन OBC जागेवर लढणाऱ्यांना समर्थन नाही"; मनोज जरांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका, शिंदेंवर पुन्हा निशाणा

धाराशिव दौऱ्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे OBC जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच आपला संघर्ष असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. तसेच प्रसाद लाड यांचे कौतुक करत प्रवीण दरेकरांनाही टोला लगावला.

jarange patil

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथे माध्यमांशी संवाद साधताना महत्त्वाचे वक्तव्य केले. कुणबी प्रमाणपत्र घेऊन OBC आरक्षणाच्या जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझे कधीच समर्थन नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आपण राजकारणासाठी नव्हे, तर गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढत असल्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.

'मी राजकारणासाठी नाही, गरीब मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढतो'

जरांगे पाटील म्हणाले की, सुरुवातीपासूनच त्यांचा लढा गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आहे आणि त्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. निवडणूक लढण्यापूर्वी संबंधितांकडे वैध प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) असणे आवश्यक असल्याचे सांगत, अशा वादांमध्ये समाजाने विनाकारण पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

'मी कोणाचा मिंधा नाही; समाजहितच महत्त्वाचं'

महाविकास आघाडी असो किंवा महायुती, आपण कोणाच्याही बाजूने नसल्याचे सांगत जरांगे पाटील म्हणाले, "मी कोणाचा मिंधा नाही. माझ्यासाठी गरीब मराठा समाज आणि त्यांचे हित सर्वांत महत्त्वाचे आहे. समाजातील मुलांना अधिकारी बनवणे हेच माझे ध्येय आहे. मला कोणत्याही राजकीय मैत्रीची गरज नाही."

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पुन्हा टीका

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही पुन्हा निशाणा साधला. "प्रमाणपत्रे रद्द करण्याचा प्रयत्न होत असेल, तर मला कोणत्याही मैत्रीची गरज नाही. माझ्यासाठी समाज महत्त्वाचा आहे. आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात येणार असेल, तर मी शांत बसणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

प्रसाद लाड यांचे कौतुक, प्रवीण दरेकरांना टोला

मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांचे कौतुक करत, समाजाच्या हितासाठी ते प्रयत्नशील असल्याचे म्हटले. त्याचवेळी प्रवीण दरेकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत त्यांना टोला लगावला. तसेच प्रसाद लाड यांच्यावर टीका करणाऱ्यांनाही त्यांनी सुनावले.

'प्रमाणपत्र रद्द करण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही'

शेवटी बोलताना जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. मराठा समाजाच्या हक्कांसाठी आपला संघर्ष पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Inline Article Ad 728x90