‘आधी आरक्षण, मग बॅनरबाजी’! हदगावमध्ये विखे पाटलांचे बॅनर फाडले; चांदवडमध्ये मुंबईकडे कूचचा इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा बारावा दिवस सुरू असताना राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. नांदेडच्या हदगावमध्ये आंदोलकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले, तर चांदवडमध्ये रास्ता रोको करत दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारकडून आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन करण्यात आले असले, तरी पुढील काही दिवसांत आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण बाराव्या दिवशीही सुरू आहे. सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता या आंदोलनाची धग पुन्हा राज्यभर पसरताना दिसत आहे. सरकारने जरांगे यांच्या 12 मागण्या मान्य केल्याचा दावा केला असला, तरी एकही मागणी मान्य झालेली नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेडच्या हदगाव तालुक्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला. सकाळी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर संतप्त आंदोलकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले. "आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, त्यानंतरच बॅनरबाजी करा", अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
दरम्यान, सरकारच्या भूमिकेवरूनही आता तणाव वाढताना दिसत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचे शिष्टमंडळ आता जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याचे म्हटले आहे. तर मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांनी मंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
चांदवडमध्ये रास्ता रोको; दोन दिवसांचा अल्टिमेटम
नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्येही सकल मराठा समाजाच्या वतीने मनमाड-गनूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करत 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
येत्या दोन दिवसांत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास चांदवड तालुक्यातील मराठा बांधव मुंबईच्या दिशेने कूच करतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनात माजी आमदार शिरीष कोतवाल, डॉ. आत्माराम कुंभार्डे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख विलास भवर यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
"सण-उत्सव आहेत, आंदोलन स्थगित करा" – उदय सामंत
दुसरीकडे, मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. "संवाद गरजेचा आहे. आमच्या नेतृत्वाला वाईट बोलू नये, हे आम्ही संयमाने सांगतो", असे सामंत यांनी म्हटले.
उद्या पोळा सण आहे, मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि राज्यात गणेशोत्सव सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाला स्थगिती द्यावी, अशी विनंती सामंत यांनी केली. सरकार संयमाने भूमिका घेत असल्याचे सांगत, जरांगे पाटील आक्रमक असले तरी सरकारला संयमानेच बोलावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याची भूमिका समोर आल्यानंतर मराठा समाजाची पुढील भूमिका काय असेल? चांदवडमधून दिलेला मुंबईकडे कूच करण्याचा इशारा प्रत्यक्षात येणार का? आणि सरकार-जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.