MMRDA भरती निकालावर आक्षेप; 30 दिवसांत तक्रार करण्याची संधी, उच्चस्तरीय समितीकडून चौकशी

MMRDAच्या 235 इंजिनिअर पदांच्या भरती परीक्षेच्या निकालावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यानंतर प्राधिकरणाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समितीमार्फत तक्रारींची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना पुरावे आणि कागदपत्रांसह 30 दिवसांत तक्रार करण्याची संधी देण्यात आली असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत भरतीची पुढील प्रक्रिया स्थगित राहणार आहे.

MMRDA

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) इंजिनिअर पदांच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांनी निकालावर आक्षेप घेत तक्रारी केल्या आहेत. काही उमेदवारांच्या गुणांवरून परीक्षेच्या निकालाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर MMRDAने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. MMRDAने दिलेल्या माहितीनुसार, प्रोव्हिजनल निकाल जाहीर झाल्यानंतर प्राधिकरणाकडे काही उमेदवारांकडून ई-मेलद्वारे तक्रारी आणि आक्षेप प्राप्त झाले आहेत. या तक्रारींची स्वतंत्र उच्चस्तरीय तीन सदस्यीय समितीकडून पडताळणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि प्रक्रियेनुसार MMRDAमध्ये 235 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरतीसाठी 26,749 उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी 20,459 उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली. ही परीक्षा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या संस्थेमार्फत घेण्यात आली होती.

MMRDAने स्पष्ट केले आहे की, परीक्षा महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार आणि शासनमान्य TCS संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ हे समितीचे अध्यक्ष असतील. तर IIT बॉम्बेचे प्राध्यापक प्रो. श्यामप्रसाद करगडे आणि प्रा. दासका सत्यनारायण मूर्ती हे समितीचे सदस्य असतील.

MMRDAने उमेदवारांना तक्रार किंवा आक्षेप असल्यास ते पुढील 30 दिवसांच्या आत प्राधिकरणाकडे सादर करण्याचे आवाहन केले आहे. तक्रारीसोबत आवश्यक पुरावे आणि संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. यासाठी MMRDAने vacancymmrda@mailmmrda.maharashtra.gov.in हा ई-मेल उपलब्ध करून दिला आहे.

या मुदतीत प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी आणि पुराव्यांची समितीकडून वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे. तसेच, या प्रकरणी MMRDAने TCSकडून खुलासाही मागवला आहे.

दरम्यान, समितीचा तपास पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही थांबवण्यात येणार आहे. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे भरती प्रक्रियेबाबत आक्षेप असलेल्या उमेदवारांसाठी पुढील 30 दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

Inline Article Ad 728x90