MPSC पेपरफुटीवरून नवा वाद; निकालावर उपस्थित झाले प्रश्न
MPSC च्या Drugs Inspector भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि निकालावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली असून, डिजिटल फॉरेन्सिक तपास, सर्व्हर लॉग्सची पडताळणी आणि चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही केली आहे.

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drugs Inspector) भरती परीक्षेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यापूर्वी या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधी फुटल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, नंतर सूत्रांच्या माहितीनुसार पेपरफुटीची तक्रार बनावट ई-मेलवर आधारित असल्याचे समोर आले.
आता राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी या भरती प्रक्रियेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे काही उमेदवारांच्या निकालाबाबत शंका व्यक्त करत स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मेहबूब शेख यांनी म्हटले की, डिसेंबर 2025 मध्ये FDA Chemical Analyst परीक्षा झाली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी, मार्च 2026 मध्ये Drugs Inspector परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांच्या निकालांची तुलना केल्यानंतर काही उमेदवारांच्या रँकमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यांच्या मते, मेहनत आणि अभ्यासामुळे निकालात सुधारणा होऊ शकते. मात्र, इतक्या कमी कालावधीत हजारोंच्या रँकमधून राज्यातील अव्वल क्रमांकापर्यंत पोहोचलेल्या काही उमेदवारांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण होत आहेत.
याशिवाय, काही उमेदवारांचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मात्र, केवळ फोटो किंवा ओळखीच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
"आमचा कोणत्याही उमेदवाराविरुद्ध वैयक्तिक आक्षेप नाही. आमचा लढा हा सत्य, पारदर्शकता आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे," असे मेहबूब शेख यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच, आवश्यक असल्यास डिजिटल फॉरेन्सिक तपास, सर्व्हर लॉग्सची पडताळणी आणि इतर तांत्रिक तपासणी करण्यात यावी. चौकशीचा अहवाल सार्वजनिक करून भरती प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.