मध्यरात्री अचानक बदललं मुंबईचं हवामान; मुसळधार पाऊस, भरतीचा धोका अन् पुढचे काही तास महत्त्वाचे!
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला असून समुद्राला मोठी भरतीही अपेक्षित आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला पाऊस मुंबईत पुन्हा एकदा जोरदार परतला आहे. शनिवारी मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाने रविवारी दुपारपर्यंत अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले. सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हिट’सारखा उकाडा सहन करणाऱ्या मुंबईकरांना पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही तासांसाठी हवामान विभागाने दिलेला इशारा चिंता वाढवणारा आहे.
मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. काही भागांमध्ये सखल ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय झाली. जुलैनंतर मुंबईत मोठ्या पावसाचे प्रमाण कमी झाले होते. किरकोळ सरी वगळता शहरात दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अचानक झालेल्या या पावसाने मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का दिला.
24 तासांत किती पाऊस?
अधिकृत आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासांत मुंबईत सरासरी 52.07 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात 72.71 मिमी, तर पश्चिम उपनगरात 65.96 मिमी पाऊस नोंदवण्यात आला.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात वातावरण ढगाळ राहणार असून मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
मुंबईकरांसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे
पावसासोबतच समुद्राच्या भरतीकडेही प्रशासनाचे लक्ष आहे. रविवारी दुपारी समुद्राला 4.46 मीटरची भरती अपेक्षित आहे. त्यानंतर सायंकाळी 7:13 वाजता 0.44 मीटरची ओहोटी राहणार आहे. मध्यरात्रीनंतर पुन्हा 4.43 मीटरची भरती येण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस आणि मोठी भरती एकाच वेळी आल्यास सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास पाणी साचणाऱ्या भागातून प्रवास टाळावा, असे आवाहन केले जात आहे.
दादर-परळ-लालबागमध्ये तारांबळ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दादर, परळ आणि लालबाग परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचीही या भागात मोठी वर्दळ आहे. अशातच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
वसई-विरार भागातही जोरदार पाऊस झाला असून काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळाले.
नांदेडमध्ये महिन्यानंतर पावसाची हजेरी
दरम्यान, नांदेडमध्येही तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी पावसाने हजेरी लावली. गेल्या 30 दिवसांपासून पाऊस न झाल्याने अनेक भागांतील पिके वाळण्याच्या स्थितीत आली होती.
शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पिके पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
आता मुंबईसह राज्यातील इतर भागांत पावसाचा जोर किती वाढतो आणि हवामान विभागाचा इशारा कितपत खरा ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.