"आडनाव काय? जात काय?”; नागराज मंजुळेंचा हिंदी सिनेसृष्टीवर निशाणा, म्हणाले—‘महत्त्वाचा प्रश्न कधी विचारलाच नाही!

अमेरिकेत झालेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) मराठी फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सिनेसृष्टी आणि जातव्यवस्थेवर परखड भाष्य केलं. हिंदी चित्रपटसृष्टीने अनेकदा जात लपवून अमीर-गरीब किंवा इतर कारणांच्या माध्यमातून कथा मांडल्या, असा दावा त्यांनी केला. “लोक आडनाव लपवलं तरी त्याची जात शोधून काढतात,” असं म्हणत मंजुळेंनी समाजातील जात ओळखण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केलं.

Nagraj Manjule

अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) मराठी फिल्म फेस्टिव्हल 2026 चा दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी ‘कॉफी विथ कौशिक’ या कार्यक्रमात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांशी संवाद साधला.

या संवादादरम्यान सिनेसृष्टी आणि जात या विषयावर नागराज मंजुळे यांनी स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली. “तुम्हाला सिनेमांमध्ये आडनाव ठेवताना विचार करावा लागतो का?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत जात कशी झाकली जाते, यावर भाष्य केलं.

“आपल्याकडे खूप शिताफीने महत्त्वाचं आहे तेच लपवलं जातं,” असं म्हणत मंजुळे यांनी आपल्या लहानपणी पाहिलेल्या चित्रपटांचा संदर्भ दिला. चित्रपटांमध्ये हिरो-हिरोईन प्रेमात पडतात, मात्र त्यांच्या लग्नाला कुटुंबीय विरोध करतात. हा विरोध अनेकदा ‘एक गरीब आहे आणि दुसरा श्रीमंत आहे’ अशा कारणांनी दाखवला जातो. मात्र, यापलीकडेही एक महत्त्वाचं कारण असू शकतं, असं मंजुळे यांनी सांगितलं.

“दोन गरीब लोकांनाही एकमेकांशी लग्न करू दिलं जाणार नाही आणि दोन श्रीमंतांनाही कदाचित करू दिलं जाणार नाहीत. मग नेमकं कारण काय? लक्षात आलं की जात आहे, जातीची आडनावं आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

‘हिंदी फिल्म इंडस्ट्रीने जात लपवली’

हिंदी चित्रपटसृष्टीने जात या मुद्द्याला अनेकदा पडद्याआड ठेवल्याचं नागराज मंजुळे म्हणाले. चित्रपटांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जातात; मात्र “आडनाव काय? जात काय? आणि या गोष्टींची पाळंमुळं काय?” हे प्रश्न विचारले जात नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यासाठी त्यांनी ‘नमक हलाल’मधील एका गाण्याचा संदर्भ देत सिनेमातील जात आणि ओळख लपवण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केलं.

‘आडनाव लपवलं तरी लोक जात शोधून काढतात!’

आपल्या ओळखीबाबत बोलताना नागराज मंजुळे यांनी स्वतःचं उदाहरण दिलं. “मी माझं नाव नागराज पोपटराव सांगितलं, मुद्दाम आडनाव लपवलं, कारण मी आडनाव मानत नाही. पण लोक विचारतात—कुठले तुम्ही?” असं ते म्हणाले.

समाजातील जात शोधण्याच्या मानसिकतेवर भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, एखाद्याचं आडनाव ‘जाधव’ असेल, तरी “कुठला जाधव? जाधवचा पाहुणा कोण? पाहुण्याचा पाहुणा कोण?” असा शोध घेतला जातो आणि शेवटी त्या व्यक्तीची जात शोधून काढली जाते.

जात, नाव, आडनाव आणि व्यवसाय या गोष्टी समाजाच्या रचनेत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे वास्तवावर केवळ ‘अमीर-गरीब’ किंवा इतर कारणांचा मुलामा न देता त्यामागची सामाजिक कारणंही मांडली पाहिजेत, अशी भूमिका नागराज मंजुळे यांनी मांडली.

त्यांच्या या परखड वक्तव्यामुळे सिनेसृष्टीतील जात आणि ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Inline Article Ad 728x90