“निर्लज्ज लोक… अकलेचा दुष्काळ!”; गिरीश महाजनांच्या पालकमंत्रिपदावर संजय राऊतांचा घणाघात
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा रखडलेला तिढा अखेर सुटला असून रायगडची जबाबदारी भरत गोगावले, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आलं आहे. या निर्णयानंतर भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाजन आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “निर्लज्ज लोक आहेत… अकलेचा दुष्काळ आहे,” अशा शब्दांत राऊतांनी निशाणा साधला.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली असून नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यावरच पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे.
या निर्णयानंतर महाजन समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून भाजपकडून जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. मात्र, याच जल्लोषावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“पहिल्यांदाच पालकमंत्रीपद मिळालं का?”
गिरीश महाजन यांच्या नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी थेट भाजपवर निशाणा साधला.
“निर्लज्ज लोक आहेत. पहिल्यांदाच पालकमंत्रीपद मिळालं का? असं काही आहे का? यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे,” अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात असल्याचं सांगितलं जात असलं, तरी हा विषय दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित न राहता वरिष्ठ पातळीवर गेल्याचा दावा राऊत यांनी केला.
“अमित शाह, पंतप्रधानांकडे विषय न्यायचा आणि शेवटी मांडवली!”
पालकमंत्रिपदाच्या निर्णयावरून सरकारला घेरताना राऊत म्हणाले की, “हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असं म्हणतात. पण हा दोन जिल्ह्यांचा वाद अमित शाह यांच्याकडे न्यायचा, पंतप्रधानांकडे जायचं. तडजोड झाली, मुंबईच्या भाषेत मांडवली झाली.”
मात्र, गिरीश महाजन यांच्याशी आपलं व्यक्तिगत भांडण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
“गिरीश महाजन यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही. आमच्या मोर्चाच्या मुहूर्तावर झालं,” असं राऊत म्हणाले.
“महाकुंभाचा मंत्री म्हणून काम दाखवा!”
नाशिकमधील विकासकामांवरूनही राऊत यांनी गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं. “महाजन कुंभमेळा मंत्री आहेत. कामाविषयी, खड्ड्यांवर लोक प्रश्न विचारत आहेत, उत्तर द्या,” असं आव्हान त्यांनी दिलं.
तसंच निधी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले. “जो पैसे खाऊन काम करत नाही, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
गिरीश महाजन काय म्हणाले?
दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा मिळाल्यानंतर गिरीश महाजन यांनी आनंद व्यक्त केला. पंढरपूरच्या दर्शनासाठी पत्नी आणि मतदारसंघातील हजारो नागरिकांसोबत गेलो असताना ही बातमी मिळाल्याचं महाजन यांनी सांगितलं.
“पांडुरंग पावला... मी दर्शन घेत असताना बायकोने हळूच कानात मी नाशिकचा पालकमंत्री झाल्याची बातमी सांगितली. बातमी कळली आणि खूप आनंद झाला,” असं महाजन म्हणाले.
यंदाचा महाकुंभ मोठ्या स्वरूपात होणार असून “नाशिकचा चेहरा-मोहरा बदलून जाईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आता पालकमंत्रिपदाचा निर्णय झाल्यानंतर संजय राऊतांची टीका आणि गिरीश महाजनांचा उत्साह यामुळे नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.