गुन्हा दाखल होताच मोठा निर्णय; भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी दिला सर्व पदांचा राजीनामा, पत्रात केला ‘हा’ दावा

कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या तक्रारीवरून सामूहिक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पवार यांनी भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला असून, आपल्याविरोधातील आरोप खोटे असल्याचा आणि बदनामीचे षडयंत्र रचल्याचा दावा त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

Narendra_Pawar

कल्याण : कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. पवार यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात एका 22 वर्षीय विवाहित तरुणीवर कथित सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मदतीच्या बहाण्याने बोलावल्याचा तक्रारीत आरोप

प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा तिच्या पतीसोबत वाद सुरू होता. हा वाद सोडवण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तिला कार्यालयात बोलावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर तिला भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे नेण्यात आले आणि शस्त्राचा धाक दाखवून तसेच मद्य पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला आहे. हे सर्व आरोप सध्या तपासाधीन आहेत.

FIR दाखल होताच नरेंद्र पवारांचा मोठा निर्णय

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच नरेंद्र पवार यांनी पक्षातील सर्व पदे सोडण्याचा निर्णय घेतला. पवार हे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे.

‘माझ्याविरोधात बदनामीचे षडयंत्र’; पवारांचा दावा

नरेंद्र पवार यांनी आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असल्याचा दावा केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणामुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का लागू नये, यासाठी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.

48 तासांत अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

काँग्रेसच्या नगरसेविका गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. दोन्ही आरोपींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली असून, कारवाई न झाल्यास महिलांसह पडघा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधातील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत आणि पोलीस तपासातून निश्चित होणार आहे. सध्या पडघा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Inline Article Ad 728x90