रात्रीच्या अंधारात दुभाजकावरील 50 झाडे अचानक गायब; CCTV तपासलं अन् समोर आलं धक्कादायक कारण, 6 जण अटकेत

नाशिकच्या गंगापूर रोडवरील दुभाजकावर लावण्यात आलेली सुमारे 50 विदेशी झाडे रात्रीच्या वेळी कुऱ्हाडीने तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासानंतर गंगापूर पोलिसांनी एका जाहिरात कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक केली. जाहिरात फलक स्पष्ट दिसावा म्हणून झाडे तोडण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Nashik_Tree Cutting Crime

नाशिक : शहरातील गंगापूर रोड परिसरात रात्रीच्या अंधारात असा प्रकार घडला की सकाळी परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनाही धक्का बसला. रस्त्याच्या दुभाजकावर लावण्यात आलेली सुमारे 50 विदेशी झाडे अचानक गायब झाली होती. झाडे नेमकी कुठे गेली आणि ती कोणी तोडली? याचा शोध सुरू होताच CCTV फुटेजमधून संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला.

गंगापूर रोडवरील दुभाजकावर असलेल्या झाडांवर रात्री कुऱ्हाडीने वार करून ती तोडण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर तोडलेली झाडे मालवाहतूक वाहनातून दुसरीकडे नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली होती.

CCTV फुटेजमधून मिळाला महत्त्वाचा धागा

झाडे अचानक गायब झाल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गंगापूर पोलिसांनी परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली.

फुटेजमध्ये काही मजूर रात्रीच्या अंधारात झाडे तोडताना तसेच तोडलेली झाडे वाहनात भरताना दिसल्याचा दावा पोलिस तपासात करण्यात आला. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.

जाहिरात फलकासाठी झाडांची कत्तल?

तपासादरम्यान 'नम्रता ॲडव्हर्टायझिंग'चे संचालक मच्छिंद्र विजय देशमुख यांच्यासह पाच मजुरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस तपासानुसार, रस्त्यावरील जाहिरात फलक वाहनचालक आणि प्रवाशांना स्पष्टपणे दिसत नव्हता. झाडांमुळे फलक झाकला जात असल्याने हा अडथळा दूर करण्यासाठी झाडे तोडण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सहा जणांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी मच्छिंद्र विजय देशमुख (44), अभिमन काशिनाथ खैरनार (37), दिलीप सदू बेंडकुळे (34), दीपक संतोष दाते (25), रोहिदास पांडुरंग खुरखुटे (45) आणि अर्जुन दत्तू चारोस्कर (38) यांना अटक केली आहे.

सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आणखी कुठे झाडे तोडली का?

या घटनेनंतर नाशिक महापालिका आणि पोलिसांकडून शहरातील इतर भागांतही जाहिरात फलक स्पष्ट दिसण्यासाठी अशाच पद्धतीने वृक्षतोड करण्यात आली आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी प्रस्तावित वृक्षतोडीवरून नाशिकमध्ये प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चर्चा सुरू असतानाच हा प्रकार समोर आल्याने शहरात पुन्हा वृक्षसंवर्धनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

Inline Article Ad 728x90