माजी खासदार झाले, पण शांत नाही; नवनीत राणांचा विरोधकांना इशारा

अमरावतीतील कार्यक्रमात माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आपण माजी खासदार झाल्याची वेदना असली तरी शांत नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेसाठी कधीही कोणाच्या दारात गेले नसून स्वाभिमानासाठी ती संधी नाकारल्याचा दावा त्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर हनुमान चालीसा आणि सत्ताकाळातील भूमिकेवरून टीका केली.

navneet rana Image

अमरावती : माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडली. माजी खासदार झाल्याची वेदना आजही मनात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचा अर्थ आपण शांत बसलो आहोत असा कोणी समजू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांच्या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या, "मी कधीही शासकीय कार्यक्रमात मंचावर जात नाही. माजी खासदार झाल्याची वेदना आहे, पण मी त्यावर फार भाष्य करत नाही. विरोधकांना शुभेच्छा दिल्या म्हणजे मी शांत बसले आहे, असा गैरसमज करू नका. शेरनी शांत असली तरी डरकाळी मारायला विसरत नाही."

महिलांविषयी बोलताना विरोधकांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे सांगत त्यांनी आपणही आपली मर्यादा कधीच ओलांडली नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी बळवंत वानखेडे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.

राज्यसभेच्या निवडीबाबत बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, "लोक नगरसेवक पदासाठीही मोठी धडपड करतात. पण माझा स्वाभिमान इतका मोठा आहे की राज्यसभेची संधी असूनही मी कोणाच्याही दारात गेले नाही. मी राज्यसभेला ठोकर मारली. माझ्या विचारांशी तडजोड करण्यापेक्षा स्वाभिमान जपणे मला अधिक महत्त्वाचे वाटते."

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार रवी राणा यांच्या पाठीशी कायम उभे असल्याचे सांगत त्यांनी मतदारसंघातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. "मुख्यमंत्री असताना त्यांना हनुमान चालीसा मान्य नव्हती. सत्ता गेल्यानंतर मात्र त्यांना राम आणि हनुमान चालीसाची आठवण झाली. मला 14 दिवस तुरुंगात राहावे लागले, तो काळ मी कधीच विसरणार नाही. त्या वेळी हनुमान चालीसाला विरोध करणारे आता त्याचाच आधार घेत आहेत," असा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्रीपदावर असतानाच श्रद्धा आणि विचारांवर ठाम राहिले असते, तर पक्षात फूट पडली नसती आणि पक्षाची अशी अवस्था झाली नसती, असा दावा करत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Inline Article Ad 728x90