नेपाळच्या महाप्रलयात महाराष्ट्रातील किती जण अडकले? फडणवीसांचा मोठा खुलासा; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन
नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलयामुळे मोठी जीवितहानी झाली असून शेकडो जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील पर्यटकही या दुर्घटनेत अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारशी समन्वय साधून बचावकार्य सुरू असल्याची माहिती दिली असून, नागरिकांनी नेपाळमध्ये गेलेल्या आपल्या नातेवाईकांबाबत माहिती प्रशासनाला देण्याचं आवाहन केलं आहे.

नेपाळ :
नेपाळमध्ये नेमकं काय घडलं?
नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलयामुळे हाहाकार उडाला आहे. या दुर्घटनेत १६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून शेकडो नागरिक बेपत्ता आहेत. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. घरं, इमारती, वाहनं आणि जनावरांसह मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
पुरामुळे अनेक भागांचा संपर्क तुटल्याने बचाव आणि मदतकार्याला अडथळे निर्माण झाले आहेत. विविध देशांमधून नेपाळमध्ये गेलेले पर्यटकही या संकटात अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील किती पर्यटक नेपाळमध्ये?
महाराष्ट्रातून नेपाळमध्ये नेमके किती पर्यटक गेले होते, याची माहिती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. संभाव्यतः अडकलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचं सांगितलं आहे. राज्य सरकारकडून या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती मदत करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
‘आम्ही अलर्ट मोडवर’; फडणवीसांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळ दुर्घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. भारतीय नागरिक आणि महाराष्ट्रातील नागरिक नेपाळमध्ये असण्याची शक्यता असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
या संपूर्ण परिस्थितीत मंत्री गिरीश महाजन संपर्क ठेवून असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. काही नागरिक तिबेटमध्येही गेल्याची माहिती असून त्यांच्याशी संपर्क झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मानसरोवर यात्रेकरूंसाठीही नियोजन
नेपाळमधील परिस्थिती लक्षात घेता मानसरोवर यात्रेला गेलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून नियोजन सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिल्लीच्या माध्यमातून केंद्र सरकारशी समन्वय साधून पुढील कार्यवाही केली जात आहे.
नागरिकांना मुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं आवाहन
नेपाळमध्ये गेलेल्या आपल्या नातेवाईकांबाबत कोणाकडेही माहिती असल्यास ती प्रशासनाला देण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
“कुणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करणार आहोत. कुणाकडे काहीही माहिती असेल तर आम्हाला द्या. आम्ही मदत करणार आहोत,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, नेपाळमधील परिस्थितीवर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार लक्ष ठेवून असून, महाराष्ट्रातील संभाव्य अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.