पेपरफुटीवरून पुण्यात विद्यार्थी रस्त्यावर; परीक्षा व्यवस्थेत बदलाची मागणी

पेपरफुटीच्या निषेधार्थ पुण्यात सलग चौथ्या दिवशी विद्यार्थी, युवक आणि नोकरदारांनी आंदोलन केले. NTA विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदलांची मागणी केली.

nta paper leak pune

पेपरफुटीच्या घटनांविरोधात पुण्यात विद्यार्थी, युवक आणि नोकरदारांनी सलग चौथ्या दिवशी आंदोलन केले. बुधवारी अपर बस डेपो, जेएम रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक तसेच विविध क्षेत्रांतील नोकरदार सहभागी झाले. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्लीत पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि अश्रुधूराच्या वापराचाही निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा लोकशाही अधिकार असून त्याचा सन्मान झाला पाहिजे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

यावेळी नौजवान भारत सभेचे प्रतिनिधी सुस्मित यांनी आंदोलनाला संबोधित केले. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, वाढती बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचारामुळे विद्यार्थी आणि युवकांमध्ये असंतोष वाढत आहे. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे हा असंतोष आणखी तीव्र झाला असून, विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.

सुस्मित यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करण्याची, नवीन शैक्षणिक धोरणाचा (NEP) फेरविचार करण्याची, शिक्षणातील खासगीकरणाला आळा घालण्याची आणि बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सर्वांसाठी मोफत, समान आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणारी समान शिक्षण व्यवस्था लागू करण्याची मागणी केली.

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली. भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटी होणार नाही, यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी यंत्रणा उभारावी, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Inline Article Ad 728x90