बापाने लेकीच्या मांडीवर सोडला जीव; मुलाला फिट्सचा त्रास... DJच्या दणदणाटामुळे कदम कुटुंबाची १० वर्षांची भयावह कहाणी

पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात DJ आणि मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीममुळे एका कुटुंबाला गेल्या १० वर्षांपासून घर सोडून राहण्याची वेळ येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आजारी मुलाला फिट्सचा त्रास असून, मागील वर्षी ऑक्सिजनवर असलेल्या वडिलांना शांत वातावरण मिळावे म्हणून घराबाहेर घेऊन जावे लागले. मात्र, त्यानंतर वडिलांचा मुलीच्या मांडीवरच मृत्यू झाल्याचे कुटुंबीय सांगतात. या घटनेनंतरही सोसायटीतील कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा आरोप आहे.

DJ Contraversy

पिंपरी-चिंचवड : सण-उत्सव म्हटलं की जल्लोष, ढोल-ताशे आणि DJचा दणदणाट हे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र, याच आवाजाचा एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याची धक्कादायक कहाणी पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरातून समोर आली आहे. आवाजाचा त्रास टाळण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून घर सोडून दुसरीकडे राहण्याची वेळ येते आणि कधी इमारतीच्या ‘रिफ्युजी एरिया’मध्ये रात्र काढावी लागते, असा दावा कदम कुटुंबाने केला आहे.

मोशी येथील मंत्रा मुव्हमेंट सोसायटीमध्ये वर्षा गणेश कदम यांचे कुटुंब राहते. त्यांच्या मुलाला वयाच्या पाचव्या वर्षापासून फिट्सचा त्रास असल्याचे त्या सांगतात. सध्या मुलगा बारावीत असून, मोठ्या आवाजामुळे त्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा कुटुंबाचा दावा आहे. वर्षा कदम यांनाही फिट्सचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले.

घराखालीच मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम आणि DJ लावला जात असल्याने घरातील दारे-खिडक्या आणि भांडी अक्षरशः थरथरतात, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

१० वर्षांपासून सण आला की घर सोडावं लागतं?

DJ आणि साऊंड सिस्टीमच्या आवाजाचा त्रास टाळण्यासाठी कदम कुटुंबाला गेल्या दहा वर्षांपासून सण-उत्सवांच्या काळात घराबाहेर राहावे लागत असल्याचे वर्षा कदम यांनी सांगितले.

कधी नातेवाईकांच्या घरी, तर कधी स्वतःच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरील ‘रिफ्युजी एरिया’मध्ये रात्र काढण्याची वेळ येते, असा त्यांचा दावा आहे. मुलाच्या परीक्षेच्या काळातही मोठ्या आवाजामुळे त्याच्या अभ्यासावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

ऑक्सिजनवर असलेल्या वडिलांना घरात शांतता मिळाली नाही

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक घटना मागील वर्षी घडल्याचा दावा कदम कुटुंबाने केला आहे.

वर्षा कदम यांचे वडील गंभीर आजारी होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना घरच्या वातावरणात नेण्याचा सल्ला दिला होता. वडिलांना ऑक्सिजन लावलेला असताना घरात शांतता मिळावी म्हणून वर्षा कदम यांनी सोसायटीतील कार्यक्रम आयोजक आणि मंडळाला साऊंड सिस्टीमचा आवाज कमी करण्याची किंवा ती दुसरीकडे हलवण्याची विनंती केल्याचे त्या सांगतात.

मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, या विनंतीकडे दुर्लक्ष झाले. अखेर आजारी वडिलांना घेऊन त्यांना बारामतीजवळील उजनी धरणाच्या फुगवठ्यात असलेल्या मूळ गावी जावे लागले.

मात्र, गावाकडे जाणारा रस्ता आणि पूल धोकादायक असल्याने तिथे वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. अखेर योग्य उपचार न मिळाल्याने वडिलांनी आपल्या मांडीवरच शेवटचा श्वास घेतला, असा हृदयद्रावक दावा वर्षा कदम यांनी केला आहे.

कुटुंबीयांनी वडिलांच्या उपचारासाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च केल्याचेही सांगितले.

‘माणूस गेल्यानंतरही कार्यक्रम सुरूच होता’

वर्षा कदम यांच्या म्हणण्यानुसार, वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही सोसायटीतील कार्यक्रम थांबवण्यात आला नाही.

“माणूस गेल्यानंतरसुद्धा सोसायटीवाल्या लोकांनी कार्यक्रम थांबवला नाही. त्या दिवशीसुद्धा रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम घेतला.”

त्यांच्या या दाव्यामुळे DJ आणि ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

‘धर्माच्या विरोधात आहात’ म्हणत गप्प करण्याचा आरोप

कुटुंबीयांनी आवाजाविरोधात तक्रार केल्यानंतर त्यांना ‘तुम्ही धर्माच्या विरोधात आहात’ असे सांगितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“आम्ही स्वतः सर्व सण-उत्सव साजरे करतो. मी स्वतः गणपती उत्सवात सहभागी होऊन पारितोषिके जिंकली आहेत. आम्ही नास्तिक नाही. मात्र, धर्माच्या नावाखाली दुसऱ्याच्या जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे?” असा सवाल वर्षा कदम यांनी केला.

‘त्रास होत असेल तर साऊंडप्रूफ काचा लावा’

कदम कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर ‘त्रास फक्त तुम्हालाच होतो, बाकी ९९ जणांना होत नाहीत’, असे सांगण्यात आले.

तसेच, त्रास होत असल्यास घराला साऊंडप्रूफ काचा बसवण्याचा किंवा दरवाजा बंद ठेवण्याचा सल्ला दिल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

“आमचे दरवाजे आणि खिडक्या अक्षरशः व्हायब्रेट होतात. इतक्या मोठ्या प्रमाणात साऊंड लावला जातो. तरी आम्हालाच साऊंडप्रूफ काचा बसवायला सांगितल्या जातात,” अशी प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली.

तक्रारी करूनही कारवाई नाही?

वर्षा कदम यांनी २०२३ मध्ये पोलिसांकडे लेखी तक्रार केल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा त्यांचा दावा आहे.

४ सप्टेंबर रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी येतात. मात्र, तोपर्यंत साऊंड बंद केला जातो आणि पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा आवाज सुरू केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आयोजकांकडून ‘पोलीस स्टेशनला जाऊनही तुमचे काही होणार नाही’, अशी धमकी दिल्याचाही दावा कुटुंबीयांनी केला आहे.

घर विकण्याची वेळ आली, पण त्यातही अडथळे?

सततच्या आवाजाच्या त्रासामुळे आता घर विकण्याचा विचार करत असतानाही अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा दावा कदम कुटुंबाने केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, घराखाली साऊंड सिस्टीम असल्याने घर कमी भावात विकले पाहिजे, असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे मानसिक त्रासासोबतच आर्थिक नुकसान होण्याची भीतीही कुटुंबाला आहे.

आता प्रशासन कारवाई करणार का?

कदम कुटुंबाच्या आरोपांनुसार, हा त्रास अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा त्रास, आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि नियमांचे उल्लंघन याबाबत प्रशासन आता काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस आणि पालिका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित साऊंड सिस्टीम आणि आयोजकांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, कदम कुटुंबाने केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित सोसायटी पदाधिकारी, आयोजक आणि प्रशासनाची बाजू समोर आल्यानंतर या प्रकरणाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येऊ शकते.

Inline Article Ad 728x90