ठाणे-नाशिकनंतर आता पुणे! खराब रस्त्यामुळे ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू

पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरात सिमेंटच्या रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरून ४२ वर्षीय सानवी पांचाळ यांचा अवजड वाहनाखाली येऊन मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. ठाणे आणि नाशिकनंतर खराब रस्त्यांमुळे पुण्यातही जीवितहानी झाल्याने रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

चाकण MIDC Image

पुणे : राज्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि जीवघेणे खड्डे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ठाणे आणि नाशिकमधील दुर्दैवी घटनांनंतर आता पुण्यातही खराब रस्त्यामुळे एका महिलेचा जीव गेला आहे. चाकण एमआयडीसी परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे दुचाकी घसरल्याने महिला अवजड वाहनाच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक फरार झाला असून, चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मृत महिलेची ओळख सानवी पांचाळ (वय ४२) अशी झाली आहे. त्या भोसरीतील इंद्रायणीनगर येथे वास्तव्यास होत्या आणि स्कोडा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी दुपारी ड्युटी संपवून त्या दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकण एमआयडीसी परिसरातील सिमेंटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला होता. या चिखलातून मार्ग काढताना त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या अवजड वाहनाच्या मागील चाकाखाली त्या आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर अवजड वाहनाचा चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.

या घटनेनंतर चाकण एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक क्षेत्रात दररोज हजारो कर्मचारी आणि जड वाहने ये-जा करत असताना रस्त्यांवर साचणारा चिखल, खड्डे आणि अपुरी देखभाल यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.

दरम्यान, मुंबई-नाशिक महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांचाही प्रश्न अद्याप कायम आहे. ठाणे टीडीआरएफचे धाडसी जवान विकास गोरे यांचा भारंगी नदी पुलाजवळील खड्ड्यात दुचाकी आदळून मृत्यू झाल्यानंतरही महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे कायम असल्याचे दिसून येत आहे. पडघा येथील कोशिंबी गाव परिसरात सहा फूट रुंद आणि दोन फूट खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकवण्यासाठी अनेक वाहने विरुद्ध दिशेने जात असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.

ठाणे, नाशिक आणि आता पुणे अशा तीन ठिकाणी काही दिवसांच्या अंतराने खराब रस्त्यांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी गेल्याने राज्यातील रस्त्यांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. नागरिकांच्या मते, केवळ अपघातानंतर आश्वासने देण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करणे हीच काळाची गरज आहे.



Inline Article Ad 728x90