शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची ट्रायल पूर्ण; पुणेकरांचा प्रवास होणार अधिक वेगवान
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका क्रमांक ३ ची ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) दरम्यान १२ स्थानकांवरून मेट्रो सेवा सुरू होणार असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता आहे. यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका क्रमांक ३ वर मेट्रोची ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी सेवा लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा मोठा दिलासा मिळणार आहे.
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर असा २३.२०३ किलोमीटर लांबीचा हा मेट्रो मार्ग असून, त्यावर एकूण २३ स्थानके असणार आहेत. पहिल्या टप्प्यात माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या सुमारे १३ किलोमीटरच्या मार्गावर १२ स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे.
या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) यांची मंजुरी मिळाली आहे. सिग्नलिंग, ट्रॅक, वीजपुरवठा, अग्निसुरक्षा आणि इतर तांत्रिक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. आधुनिक CBTC सिग्नलिंग प्रणाली आणि ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल तंत्रज्ञानामुळे ही मेट्रो ताशी ८० किलोमीटर वेगाने धावणार आहे.
या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता असून, सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यालाही वेग मिळाला आहे. भक्ती-शक्ती चौक ते चाकण असा सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा नवीन मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत १३ हजार कोटी रुपये असून, या मार्गावर ३४ स्थानके प्रस्तावित आहेत.
या नवीन मार्गामुळे हिंजवडी आयटी पार्क, भोसरी एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसी यांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे रोजचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत होणार आहे.
वाकड आणि वल्लभनगर येथे अतिरिक्त स्थानके उभारण्याची मागणी तसेच भोसरी उड्डाणपुलाच्या मार्गाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.