पुण्यात वीजचोरांवर महावितरणचा धडक प्रहार; १५ दिवसांत १,२८१ जणांवर कारवाई
महावितरणने पुणे परिमंडलात १५ दिवसांच्या विशेष मोहिमेत १,२८१ वीजचोरांवर कारवाई करत ३.४० लाख युनिट वीजचोरी उघडकीस आणली. संबंधितांना ८१.५५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
स्रोत: Madhura Manbhekar

पुणे : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने पुणे परिमंडलात विशेष धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. अवघ्या १५ दिवसांत १,२८१ वीजचोरांचा पर्दाफाश करण्यात आला असून त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार ७३० युनिट वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील संबंधितांवर एकूण ८१ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ आणि १३८ अंतर्गत मीटरमध्ये फेरफार करणे, थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणे, तसेच इतर बेकायदेशीर मार्गाने वीज वापरणाऱ्यांवर महावितरणकडून कारवाई केली जाते. याशिवाय मंजूर उद्देशापेक्षा वेगळ्या कारणासाठी वीज वापरणाऱ्यांवरही संबंधित कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई केली जाते.
महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी वीजचोरीविरोधात कठोर मोहीम राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुणे परिमंडलात विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे वीजचोरी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
या कारवाईत रास्तापेठ शहर मंडळात ३७५, पुणे ग्रामीण मंडळात ५८० आणि गणेशखिंड शहर मंडळात ३२६ अशा एकूण १,२८१ जणांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर वीजचोरी झाल्याचे तपासात समोर आले असून त्यांच्याकडून दंडाची वसुली सुरू आहे.
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या कालावधीतही पुणे परिमंडलात वीजचोरीविरोधातील मोहीम सातत्याने सुरू आहे. या चार महिन्यांत २,२८३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली असून ८ लाख ७४ हजार ५५९ युनिट वीजचोरी उघडकीस आली आहे. या प्रकरणांमध्ये संबंधितांकडून एकूण ७ कोटी ६१ लाख ३१ हजार ६९० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
महावितरणने नागरिकांना आवाहन करताना वीज ही राष्ट्रीय संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. वीजचोरी हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी दंडासोबत कारावासाचीही तरतूद आहे. तसेच वीजचोरी करताना अपघात होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा आणि वीजचोरी आढळल्यास त्याची माहिती महावितरणला द्यावी, असे आवाहन मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.