पुणे पोलिसांत मोठी कारवाई; अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुण्यात एकाच दिवशी घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव यांची बदली करण्यात आली असून, धनंजय पिंगळे यांची खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय येरवडा आणि लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यांमध्येही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

पोलीस आयुक्त image

पुणे : शहरात एकाच दिवशी घडलेल्या दोन धक्कादायक गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या गंभीर घटनांची तातडीने दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पाऊल उचलत अनेक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गुन्हेगारी रोखण्यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भारत चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अजित महादेव जाधव यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात तसेच गोळीबाराच्या घटना रोखण्यात अपेक्षित यश न आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या बदल्यांसोबतच वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक धनंजय विठ्ठल पिंगळे यांची खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पोलीस कामकाज अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

याशिवाय पोलीस प्रशासनात आणखी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अंजुम कासिम बागवान यांची येरवडा पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. तर उमेश आंबादास गिट्टे यांची येरवडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निळकंठ राजाराम जगताप यांची लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरात अलीकडच्या काळात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण प्रशासकीय कारवाई म्हणून पाहिले जात आहे. गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण ठेवणे, पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, हा या बदल्यांमागील प्रमुख उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलाला स्पष्ट इशारा मिळाला असून, आपल्या कार्यक्षेत्रात गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक सतर्क आणि जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे.

Inline Article Ad 728x90