शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकारकडून 6 रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ; करडईला तब्बल ₹675 ची वाढ, नवे दर पाहा

केंद्र सरकारने 2027-28 च्या रब्बी मार्केटिंग हंगामासाठी गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी आणि करडईच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सर्वाधिक ₹675 प्रति क्विंटल वाढ करडईच्या MSP मध्ये करण्यात आली असून गव्हाचा हमीभाव ₹2,610 प्रति क्विंटल झाला आहे.

MSP

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत 2027-28 च्या रब्बी मार्केटिंग हंगामासाठी सहा प्रमुख रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी-रेपसीड आणि करडई या पिकांचा यामध्ये समावेश आहे.

कोणत्या पिकाला किती MSP?

केंद्राच्या नव्या निर्णयानुसार गव्हाचा MSP ₹25 ने वाढवून ₹2,610 प्रति क्विंटल करण्यात आला आहे. बार्लीच्या MSP मध्ये ₹136 ची वाढ करण्यात आली असून आता त्याला ₹2,286 प्रति क्विंटल हमीभाव मिळणार आहे.

हरभऱ्याच्या MSP मध्ये ₹83 वाढ करण्यात आली असून नवा दर ₹5,958 प्रति क्विंटल आहे. मसूरच्या MSP मध्ये ₹390 ची वाढ करून तो ₹7,390 प्रति क्विंटल करण्यात आला आहे.

मोहरी आणि रेपसीडच्या हमीभावात ₹413 प्रति क्विंटलची वाढ करण्यात आली असून नवा MSP ₹6,613 प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. सर्वाधिक वाढ करडईच्या MSP मध्ये झाली आहे. करडईचा दर ₹675 ने वाढून ₹7,215 प्रति क्विंटल झाला आहे.

करडईला सर्वाधिक ₹675 ची वाढ

2027-28 च्या रब्बी हंगामासाठी घोषित केलेल्या दरांमध्ये करडईला सर्वाधिक ₹675 प्रति क्विंटलची वाढ मिळाली आहे. त्यानंतर मोहरी आणि रेपसीडला ₹413, मसूरला ₹390, बार्लीला ₹136, हरभऱ्याला ₹83 तर गव्हाला ₹25 प्रति क्विंटल वाढ देण्यात आली आहे.

उत्पादन खर्चाच्या तुलनेत किती नफा?

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत गव्हासाठी अंदाजित मार्जिन 106 टक्के आहे.

मोहरी आणि रेपसीडसाठी हे मार्जिन 96 टक्के, मसूरसाठी 92 टक्के, हरभऱ्यासाठी 59 टक्के, बार्लीसाठी 58 टक्के आणि करडईसाठी 50 टक्के असल्याचे सरकारने म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, रब्बी पिकांच्या MSP मधील ही वाढ शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला लाभदायक दर मिळवून देण्यासोबतच कडधान्ये आणि तेलबिया पिकांकडे वळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली आहे.

रब्बी पिकांचे नवे MSP दर

गहू – ₹2,610 प्रति क्विंटल
बार्ली – ₹2,286 प्रति क्विंटल
हरभरा – ₹5,958 प्रति क्विंटल
मसूर – ₹7,390 प्रति क्विंटल
मोहरी आणि रेपसीड – ₹6,613 प्रति क्विंटल
करडई – ₹7,215 प्रति क्विंटल

2026-27 च्या हंगामात गव्हाचा MSP ₹2,585, बार्ली ₹2,150, हरभरा ₹5,875, मसूर ₹7,000, मोहरी-रेपसीड ₹6,200 आणि करडई ₹6,540 प्रति क्विंटल होता.

दिल्लीसाठी ₹1,790 कोटींची स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्था

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली पोलिसांच्या Intelligent Traffic Management System अर्थात ITMS प्रकल्पालाही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पावर सुमारे ₹1,789 कोटी खर्च अपेक्षित असून दिल्लीतील 42 वाहतूक कॉरिडॉर यामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत.

हा प्रकल्प तीन टप्प्यांत 24 महिन्यांत राबवला जाणार असून वाहतुकीच्या प्रत्यक्ष स्थितीनुसार सिग्नलचे टाइमिंग बदलणे आणि उपलब्ध रस्त्यांच्या क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

PM-DHARA योजनेलाही मंजुरी

मंत्रिमंडळाने PM-DHARA अर्थात PM-Developing Harmonized and Accelerated Renewable-energy Access योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील ट्रान्समिशन नेटवर्क मजबूत करून 135 गिगावॅटपर्यंत नवीकरणीय ऊर्जेचे वहन करण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

योजनेत 50 GWh क्षमतेच्या Battery Energy Storage Systems चादेखील समावेश आहे. त्यामुळे सौर आणि इतर नवीकरणीय ऊर्जेच्या निर्मितीतील चढ-उतार हाताळणे तसेच पीक अवर्समध्ये ग्रिडवरील ताण कमी करणे शक्य होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Inline Article Ad 728x90