पुण्यात राहुल गांधींच्या ‘पितृसत्ता मोडा’ वक्तव्यावर बांसुरी स्वराजांचा पलटवार; काँग्रेसला थेट सवाल
पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी ‘Smash the Patriarchy’चा नारा दिल्यानंतर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. महिलांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्यांवर राहुल गांधींच्या मौनाचा दाखला देत, काँग्रेसच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पुणे : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात ‘Smash the Patriarchy’ म्हणजेच पितृसत्ता मोडून काढा, असे आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत काँग्रेसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी देशातील युवक आणि मतदारांची दिशाभूल करण्यासाठी खोटा नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बांसुरी स्वराज म्हणाल्या, “राहुल गांधींच्या ‘Smash the Patriarchy’ या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. मात्र, हा नारा फक्त पुण्यातील मंचापुरताच मर्यादित आहे का? काँग्रेस पक्ष स्वतःच्या राजकीय वर्तुळात पितृसत्तेलाच संरक्षण देण्याचे काम करतो.”
कंगना रणौतपासून हेमा मालिनींपर्यंत काँग्रेसवर निशाणा
पत्रकार परिषदेत बांसुरी स्वराज यांनी काँग्रेस नेत्यांकडून महिलांबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचा संदर्भ देत राहुल गांधींवर टीका केली. कंगना रणौत यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा उल्लेख त्यांनी केला. या प्रकरणात राहुल गांधी यांनी मौन का बाळगले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, एप्रिल 2024 मध्ये काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही राहुल गांधी शांत राहिल्याचा आरोप बांसुरी स्वराज यांनी केला.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या ‘राष्ट्रपत्नी’ उल्लेखाचाही त्यांनी संदर्भ दिला. महिलांचा सन्मान आणि पितृसत्तेविरोधात राहुल गांधी बोलत असतील, तर काँग्रेसमधील अशा वक्तव्यांवर पक्ष नेतृत्वाने कठोर भूमिका का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला.
शाह बानो आणि तीन तलाकच्या मुद्द्यावरही सवाल
धर्माशी संबंधित विषयांवर राहुल गांधींची ‘पितृसत्ता मोडून काढण्याची’ भूमिका कुठे जाते, असा प्रश्नही बांसुरी स्वराज यांनी उपस्थित केला.
“जर राहुल गांधींना खरोखरच पितृसत्ता संपवायची असेल, तर शाह बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस सरकारने कायदा करून तो निर्णय का बदलला? तसेच, काँग्रेसने तीन तलाक कायद्याला विरोध का केला?” असा थेट सवाल त्यांनी केला.
‘राहुल गांधींकडे सकारात्मक अजेंडा नाही’
राहुल गांधींकडे कोणताही सकारात्मक अजेंडा किंवा ठोस व्हिजन नसल्याची टीकाही बांसुरी स्वराज यांनी केली. त्यांच्या मते, राहुल गांधी त्यांच्या रिसर्च टीमकडून तयार करून दिलेली चिठ्ठी वाचून दाखवतात आणि त्याच माध्यमातून राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात.
राहुल गांधींच्या ‘Smash the Patriarchy’च्या वक्तव्यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे.