साखरेच्या दरवाढीवर माजी मंत्र्यांचा ‘मास्टर प्लॅन’; मुख्यमंत्र्यांकडे केली भन्नाट मागणी!

साखरेच्या वाढत्या दरावरून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून साखरेचे भाव निम्म्यावर आणण्याची आणि सरकारचा महसूल वाढवण्यासाठी दारूचे दर दहापट वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, साखरेच्या दरवाढीमागे घटलेला साठा आणि देशांतर्गत पुरवठ्याचा ताण ही कारणे सांगितली जात आहेत. सरकारच्या १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याच्या निर्णयामुळे दर कमी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnvis_ Subodh Savji

पुणे : सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या बजेटला मोठा धक्का बसला आहे. साखरेचे दर ५० रुपयांवरून ७० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याचा दावा होत असतानाच, या दरवाढीवरून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मात्र, त्यांच्या पत्रातील मागणीने आता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचेही लक्ष वेधले आहे.

नेमकी काय आहे सावजींची मागणी?

साखरेचे दर निम्म्यावर आणावेत आणि सरकारचा महसूल वाढवण्यासाठी दारूच्या किमती तब्बल दहापट वाढवाव्यात, अशी मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे. आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

याचबरोबर, सरकारच्या निर्णयांविरोधात सामान्य नागरिक आंदोलन करत नाहीत, कारण त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल होण्याची भीती असते, असा टोला देखील सावजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला आहे. त्यामुळे सरकार करत असलेले प्रत्येक काम योग्यच आहे, असे समजू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

पण साखरेचे भाव अचानक का वाढले?

साखरेच्या दरवाढीमागे कारखान्यांकडील साठ्यात झालेली घट हे प्रमुख कारण असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. २०२५-२६ च्या साखर हंगामात देशातील वापर उत्पादनापेक्षा अधिक राहिल्याने उपलब्ध साठा कमी होत गेला. त्याचा परिणाम साखरेच्या पुरवठ्यावर झाला आणि बाजारातील दर वाढल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, उत्पादनाच्या अंदाजाच्या आधारे सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली होती. निर्यातीवर निर्बंध येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात साखर परदेशात गेल्याने देशांतर्गत उपलब्धतेवरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सरकार साखर आयात करणार?

साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. सरकारने १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या आयातीमुळे देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा वाढून दर कमी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर निम्मे आणि दारूचे दर दहापट, या सुबोध सावजी यांच्या मागणीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Inline Article Ad 728x90