दिवेआगर समुद्रकिनारी भीषण दुर्घटना; सहलीसाठी आलेल्या पुण्यातील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
रायगडमधील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या पुण्यातील आळंदी येथील खासगी क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. 42 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची ही सहल होती. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे.

रायगड : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या खासगी क्लासमधील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थी दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. या सहलीमध्ये 42 विद्यार्थी आणि दोन शिक्षक अशा एकूण 44 जणांचा समावेश होता. सर्व विद्यार्थी अकरावीमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती आळंदी नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.
समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी पाण्यात बुडाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले. सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून ते बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटना नेमकी कशी घडली, समुद्रकिनारी सुरक्षेची व्यवस्था काय होती आणि विद्यार्थ्यांना समुद्रात जाण्यापूर्वी कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या, याबाबत अधिक तपास सुरू आहे.
मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांनीही प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली माहिती
दिवेआगर येथील दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्यासह परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले असून, प्रशासनाने आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.