राज ठाकरे यांचा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा; NEET घोटाळ्यावर गंभीर प्रश्न
दिल्ली — सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे जंतर-मंतर येथे सुरू असलेले उपोषण आज 19व्या दिवशी पोहोचले आहे. 28 जूनपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीत चिंताजनक बिघाड झाला असून, त्यांचे वजन सुमारे 8.9 किलोने घटल्याची माहिती समोर आली आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली सुरू असलेल्या या आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे NEET-UG पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शैक्षणिक व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि पेपरफुटीमुळे प्रभावित विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत, "मंत्र्यांची हकालपट्टी करा आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करा, एवढीच मागणी आहे. यात काहीही गैर नाही," असे मत व्यक्त केले. NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असल्याची टीकाही त्यांनी केली.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी त्यांना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, माध्यमे आणि त्यांच्या मालकांवर नियंत्रण ठेवून विरोधी मतांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले. निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो, मात्र त्या निधीचा स्रोत बहुतेक माध्यमे विचारत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, 2018 मध्ये भाजप सरकारने 'री-इन्व्हेस्ट' परिषदेसाठी सोनम वांगचुक यांना निमंत्रित करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले होते. मात्र, लडाखच्या प्रशासकीय अधिकारांबाबत आणि स्थानिकांच्या जमीन हक्कांबाबत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहावे, अशी विनंती करत राज ठाकरे म्हणाले की, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित घोटाळ्यांचा विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे राजकीय नव्हे, तर सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कोण आहेत सोनम वांगचुक?
सोनम वांगचुक हे लडाखमधील प्रसिद्ध मेकॅनिकल अभियंता, शिक्षणतज्ज्ञ, नवोन्मेषक आणि पर्यावरणवादी आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील 'फुन्सुख वांगडू' हे पात्र साकारण्यात आले होते. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले असून, हिवाळ्यात पाणी साठवण्यासाठी विकसित केलेल्या 'आइस स्तूप' या संकल्पनेला जागतिक स्तरावर विशेष दाद मिळाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.