"आम्ही स्वतः निवडून येत नाही, पण कोणाला निवडून आणायचं अन् कोणाला पाडायचं ही ताकद आमच्याकडे!" रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रायगडमधील पाली येथे आरपीआयच्या राजकीय ताकदीबाबत मोठं वक्तव्य केलं. पक्षासाठी दोन महामंडळांची अध्यक्षपदं आणि विधान परिषदेची एक जागा मागितल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पाठराखण करत रायगडमधील इतर तालुक्यांनाही दुष्काळी मदतीसाठी विचारात घेण्याची मागणी केली.

Ramdas_Athavle

रायगड : "आम्ही आमच्या ताकदीवर निवडून येत नाही. मात्र, आरपीआय पक्ष महाराष्ट्रात सत्तेत नसला, तरी कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं, ही ताकद आणि मतं आमच्याकडे आहेत," असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. कार्यकर्त्यांची ताकद आपल्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय राज्यमंत्रिपदाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील पाली येथे आठवले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, आरपीआयच्या मागण्या, निवडणूक आयोग आणि रायगडमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केलं.

दोन महामंडळांची अध्यक्षपदं आणि विधान परिषदेची एक जागा मागितली

राज्यातील सत्तेत आरपीआयला प्रतिनिधित्व मिळावं, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्या केल्याचं आठवले यांनी सांगितलं. दोन महामंडळांची अध्यक्षपदं आणि विधान परिषदेची एक जागा पक्षाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात फडणवीस यांनी आपल्याला आश्वासन दिल्याचाही दावा त्यांनी केला.

"ज्ञानेश कुमार यांनी दबावाखाली राजीनामा देऊ नये"

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. राजीनाम्याची मागणी करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीवर त्यांनी टीका केली. पक्षाने आपलं नाव बदलून 'राजीनामा जनता पार्टी' असं ठेवावं, असा टोला त्यांनी लगावला.

ज्ञानेश कुमार यांनी कोणाच्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये, अशी भूमिका आठवले यांनी मांडली.

रायगडमधील इतर तालुक्यांचाही विचार व्हावा

रायगड जिल्ह्यातील केवळ श्रीवर्धन तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आल्याबद्दल आठवले यांनी चिंता व्यक्त केली. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील शेतीच्या नुकसानीचाही विचार होण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यातील २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागांमध्ये समावेश करण्यात आल्याचं सांगत त्यांनी रायगडमधील परिस्थितीकडे लक्ष वेधलं. उशिरा आलेला पाऊस आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भातशेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आठवले म्हणाले.

"गेल्या दहा वर्षांत पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले"

केंद्र सरकारमध्ये दहा वर्षे काम करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचं आठवले यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मदत मिळत असल्याचाही दावा त्यांनी केला.

गेल्या दहा वर्षांत आरपीआयचा विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचं सांगत त्यांनी गोरगरिबांना न्याय मिळवून देणं हीच आपली भूमिका असल्याचं स्पष्ट केलं. देशातील प्रत्येक राज्यात आरपीआयची शाखा असल्याचा दावा करत महाराष्ट्रातून पक्षाचे आणखी दोन खासदार निवडून आल्यास पक्षाला राज्यात मान्यताप्राप्त पक्षाचा दर्जा मिळू शकतो, असंही आठवले म्हणाले.

Inline Article Ad 728x90