"प्रभात रोडचा 'लक्ष्मी रोड' होण्याची भीती; अभिनेता रमेश परदेशी यांची अनियंत्रित शहरीकरणावर संतप्त पोस्ट"
अभिनेते रमेश परदेशी (पिठ्या भाई) यांनी फेसबुक पोस्टद्वारे पुण्यातील अनियंत्रित शहरीकरण आणि वाढत्या व्यावसायिकीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभात रोड आणि भांडारकर रोडसारख्या शांत परिसरांचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याची खंत व्यक्त करत, रहिवासी भागात बहुमजली आणि व्यावसायिक प्रकल्पांना परवानगी देण्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वाढती लोकसंख्या, संभाव्य पाणीटंचाई, झाडांची घट आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी नियोजनबद्ध विकास आणि कठोर प्रशासनिक उपाययोजनांची मागणी केली.

पुणे: पुण्यातील अनियंत्रित शहरीकरण, वाढते व्यावसायिकीकरण आणि रहिवासी भागातील बदलत्या परिस्थितीवर अभिनेते रमेश परदेशी (पिठ्या भाई) यांनी फेसबुक पोस्टद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "Generation X" या शीर्षकाखाली केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी प्रभात रोड, भांडारकर रोडसारख्या शांत परिसरांचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याची खंत व्यक्त केली आहे.
रमेश परदेशी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काहीच दिवसांत प्रभात रोड हा लक्ष्मी रोड क्रमांक २ आणि भांडारकर रोड हा कुमठेकर रोड क्रमांक २ होईल. शांतता शोधण्यासाठी चंद्रावर जावे लागेल," असे म्हणत त्यांनी वाढत्या बांधकामांवर आणि व्यावसायिकीकरणावर टीका केली.
एक मजली बंगल्यांच्या जागी १० ते १२ मजली इमारती उभ्या राहत असल्याने प्रशासन अशा प्रकल्पांना परवानगी का देत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच लोकप्रतिनिधींनीही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
रहिवासी भागात व्यावसायिक प्रकल्पांना परवानगी न देता, मोठ्या जागांवरच बहुमजली इमारती उभाराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात पाणीटंचाई गंभीर होऊ शकते, तसेच झाडांची संख्या कमी होत असून शहरातील शांतता नष्ट होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
याशिवाय शहरातील कचरा व्यवस्थापनावरही त्यांनी भाष्य केले. कचरा टाकणाऱ्यांविरोधात जनजागृतीसोबतच कठोर दंडात्मक कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.
रमेश परदेशी यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत असून, पुण्याच्या नियोजनबद्ध विकासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.