दिल्लीच्या सत्य निकेतनमध्ये थरारक दुर्घटना; पाच मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरू
दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू आणि तीन विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकले असण्याची भीती असून एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
.jpg)
नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात पाच मजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून तीन विद्यार्थी जखमी झाल्याचे समोर आले आहे. मात्र, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण अडकले आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सत्य निकेतनजवळील शिव मंदिर परिसरात ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, इमारत कोसळली त्यावेळी आत तब्बल ४० ते ४५ जण उपस्थित असण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. काही अंदाजानुसार ३० ते ३५ विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ही संख्या अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि एनडीआरएफची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीसह इतर यंत्रसामग्रीचा वापर केला जात असून, बचाव पथकांकडून अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्याला मदत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.
विशेष म्हणजे, आज सुट्टीचा दिवस असल्याने इमारतीमध्ये विद्यार्थ्यांची नेहमीपेक्षा अधिक गर्दी असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. घटनास्थळापासून दिल्ली विद्यापीठाचा साउथ कॅम्पस जवळ असल्याने या इमारतीत विद्यार्थी वास्तव्यास असल्याचा अंदाज आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही व्यक्तींकडून फोन येत असल्याचा दावा घटनास्थळी पोहोचलेल्या आरके पुरमचे आमदार अनिल कुमार शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे बचाव पथकांकडून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
अग्निशमन दलाने काही नागरिकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, बचावण्यात आलेल्या व्यक्तींची नेमकी संख्या आणि दुर्घटनेतील एकूण जखमींबाबत अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोहोचले असून बचाव आणि मदतकार्यात सहभागी झाल्याचे संघटनेने सांगितले आहे. इमारत कोसळण्याचे नेमके कारण काय, तसेच ढिगाऱ्याखाली प्रत्यक्षात किती जण अडकले आहेत, याचा तपास आता सुरू आहे.
सध्या सर्वांचे लक्ष बचावकार्याकडे लागले असून ढिगारा हटवल्यानंतरच दुर्घटनेची खरी व्याप्ती स्पष्ट होणार आहे.