एनडीएच्या चर्चांवर रोहित पवार म्हणाले, 'शरद पवार कुठेही जाणार नाहीत'
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी होती, असे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यातील पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारवर टीका करत सीईटी प्रकरणात पुरावे गोळा करत असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सोबत जाणार नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी घेतलेली भेट ही विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांचा मुद्दा मांडण्यासाठी होती, असे रोहित पवार यांनी सांगितले.
अलीकडेच दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग आला. मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नाहीत. विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय आणि स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांचा मुद्दा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडला. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हाच त्या भेटीमागचा उद्देश होता."
ते पुढे म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तसेच 10 ऑगस्ट रोजी दिल्लीत रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अशा भेटींना राजकीय अर्थ लावू नये, असेही त्यांनी सांगितले.
रोहित पवार म्हणाले, "आमच्या पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदार पक्षाच्या विचारांशी ठाम आहेत. मी जनतेसोबत आणि पक्षाच्या विचारांसोबत राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एनडीएसोबत जाणार नाही."
पेपरफुटीवर सरकारवर निशाणा
यावेळी रोहित पवार यांनी राज्यातील पेपरफुटीच्या घटनांवरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विविध भरती आणि प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. सीईटी परीक्षेबाबतही विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्या असून हा गंभीर विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
"ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही, त्या राज्यांत पेपरफुटी झाली की भाजप आंदोलन करते. मग महाराष्ट्रात अशा घटनांवर भाजपने आंदोलन का करू नये?" असा सवाल त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, पेपरफुटीबाबत काही पुरावे आणि कागदपत्रे गृहखात्याकडे देण्यात आली आहेत. मात्र, सरकारकडून कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचे सांगितले जात आहे.
"सीईटी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती मिळत आहे. आम्ही पुरावे गोळा करत आहोत. सर्व पुरावे समोर आल्यानंतरच पुढील भूमिका जाहीर करू," असेही रोहित पवार यांनी सांगितले.