SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून पैसे काढण्याचे नियम बदलणार; ४ व्यवहारांनंतर किती शुल्क लागणार?

भारतीय स्टेट बँकेने (SBI) बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेदारांसाठी रोख रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये बदल जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून महिन्यातील चार मोफत व्यवहारांनंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी १५ रुपये आणि जीएसटी आकारला जाणार आहे. एटीएम, बँक शाखा आणि आधारद्वारे पैसे काढण्याच्या व्यवहारांवर हा नियम लागू होईल. मात्र, डिजिटल व्यवहार मोफत राहणार आहेत.

SBI Related News

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) काही खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँकेने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांमधून रोख रक्कम काढण्याच्या शुल्कात बदल जाहीर केला आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून नवे नियम लागू होणार असून, महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढणाऱ्या संबंधित खातेदारांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.


कोणत्या खातेदारांना बसणार फटका?

एसबीआयचा हा नवा नियम सर्व बचत खातेधारकांना लागू होणार नाही. बँकेच्या शाखांमार्फत उघडण्यात आलेल्या बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसाठी हे सुधारित शुल्क लागू असेल.

प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी ही खाती उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही. तसेच खातेदारांना मोफत रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड दिले जाते.


महिन्यात किती वेळा पैसे काढता येणार मोफत?

नव्या नियमांनुसार, संबंधित BSBD खातेदारांना दरमहा चार वेळा मोफत रोख रक्कम काढता येणार आहे. यामध्ये एसबीआयचे एटीएम, इतर बँकांचे एटीएम, बँक शाखा आणि AePS द्वारे केलेल्या रोख व्यवहारांचा समावेश असेल.

नव्या नियमांनुसार शुल्क

पहिले ४ रोख व्यवहार

मोफत

पाचव्या व्यवहारापासून

₹१५ + GST

डिजिटल व्यवहार

मोफत

नियमांची अंमलबजावणी

१ ऑक्टोबर २०२६

शाखेमार्फत उघडलेल्या BSBD खात्यांसाठी सुधारित नियम.

आधारद्वारे पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल

नव्या नियमांमधील महत्त्वाचा बदल आधार सक्षम पेमेंट प्रणालीशी (AePS) संबंधित आहे. यापूर्वी चार मोफत रोख व्यवहारांची मर्यादा मोजताना AePS व्यवहारांना मिळणारी सूट आता काढून घेण्यात येणार आहे.

यामुळे ग्राहकाने महिन्यात तीन वेळा एटीएममधून आणि एकदा AePS द्वारे पैसे काढले, तर त्याची चार मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्ण होईल. त्यानंतरच्या प्रत्येक रोख व्यवहारासाठी १५ रुपये आणि लागू जीएसटी भरावा लागेल.


UPI आणि नेट बँकिंग व्यवहारांचे काय?

एसबीआयने स्पष्ट केले आहे की, BSBD खातेदारांचे डिजिटल व्यवहार पूर्वीप्रमाणेच कोणत्याही संख्यात्मक मर्यादेशिवाय मोफत राहणार आहेत. त्यामुळे रोख रक्कम काढण्याच्या नव्या नियमांचा ग्राहकांच्या नियमित डिजिटल बँकिंग व्यवहारांवर परिणाम होणार नाही.


दरम्यान, १५ ऑक्टोबरपासून काही व्यापारी UPI व्यवहारांवर लागू होणारा मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) हा स्वतंत्र विषय आहे. हे शुल्क थेट ग्राहकांच्या सर्व UPI व्यवहारांवर आकारण्यात येणार नाही.


एसबीआयच्या तिमाही नफ्यात १०.२३ टक्क्यांची वाढ

एसबीआयने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल ते जून तिमाहीत २१,१२१ कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षातील याच कालावधीतील १९,१६० कोटी रुपयांच्या तुलनेत ही १०.२३ टक्क्यांची वाढ आहे.


दरम्यान, ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नव्या नियमांच्या पार्श्वभूमीवर BSBD खातेदारांनी आपल्या मासिक रोख व्यवहारांची संख्या लक्षात ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

Inline Article Ad 728x90