प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; मित्र पप्या शिंदेच कटात सहभागी? गोळीबारानंतर स्वतःच नेलं रुग्णालयात
ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळीबार आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्या शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून, त्यानेच इतर आरोपींना कार्यालयात आणून हल्ल्याचा कट रचण्यात मदत केल्याचा पोलिस तपासातील दावा आहे. अन्य चार आरोपींचा शोध सुरू आहे.
.jpg)
ठाणे : मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला तसेच धारदार शस्त्रांनी वार केले. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या हत्या प्रकरणाच्या तपासात आता पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्या शिंदे याची भूमिका समोर आली आहे. पोलिस तपासानुसार, हल्ल्याच्या वेळी पप्या शिंदे पूर्णेकर यांच्या कार्यालयात उपस्थित होता. हल्ल्यानंतर त्यानेच पूर्णेकर यांना रुग्णालयात नेले होते. मात्र त्याच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
पप्या शिंदेनेच आरोपींना दिला सिग्नल?
तपासातील माहितीनुसार, पप्या शिंदे हा पूर्णेकर यांच्या कार्यालयात आधीपासून बसला होता. काही वेळ गप्पा झाल्यानंतर त्याने इतर आरोपींना संकेत दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अन्य आरोपी कार्यालयात आले. काही आरोपींनी गोळीबार केला, तर इतरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा तपासातील दावा आहे. हल्ल्यानंतर चार आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
जुनी मैत्री, तरीही कटात सहभागाचा संशय
पप्या शिंदे आणि प्रदीप पूर्णेकर यांची जुनी मैत्री असल्याची माहिती समोर आली आहे. काही काळ दोघांमध्ये संवाद बंद होता; मात्र अलीकडच्या दिवसांत पप्या पुन्हा पूर्णेकर यांच्या संपर्कात आला होता. पोलिसांच्या तपासात पप्या शिंदेचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचा दावा करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
चार फरार आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणात एकूण पाच आरोपी असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पप्या शिंदेला अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत. हत्येमागील नेमका उद्देश आणि इतर आरोपींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
या हत्येमागे राजकीय किंवा वैयक्तिक वाद होता का, यासह विविध शक्यतांचा पोलीस तपास करत आहेत. कुटुंबीयांकडूनही काही गंभीर आरोप करण्यात आले असून त्या आरोपांची स्वतंत्र पडताळणी सुरू आहे.