बाईक टॅक्सीच्या निर्णयावरून संजय राऊत विरुद्ध प्रताप सरनाईक; ‘सामना’ कार्यालयात चर्चेचे आव्हान
राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून रिक्षाचालकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर टीका करत काही मंत्र्यांचे बाईक टॅक्सी कंपन्यांशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठोस पुरावे सादरण्याचे आव्हान दिले असून, रिक्षाचालकांच्या प्रश्नावर ‘सामना’ कार्यालयात प्रत्यक्ष चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून सरकारवर टीका केली. बाईक टॅक्सी कंपन्यांशी काही मंत्र्यांचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
राऊतांच्या पत्राला प्रताप सरनाईक यांनी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. रिक्षाचालकांच्या प्रश्नांबाबत राऊतांनी दाखवलेल्या ‘अचानकच्या आस्थेचे’ स्वागत असल्याचे म्हणत सरनाईक यांनी त्यांच्या आरोपांवर पुरावे सादरण्याचे आव्हान दिले.
बाईक टॅक्सीमुळे एका बाजूला रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तर दुसऱ्या बाजूला मराठी तरुण-तरुणींना रोजगाराच्या नव्या संधी मिळू शकतात, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. बदलत्या वाहतूक व्यवस्थेपासून महाराष्ट्राला दूर ठेवता येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले.
रॅपिडो किंवा अन्य कोणतीही कंपनी सरकारपेक्षा मोठी नसून, कोणत्याही कंपनीला नियमांपेक्षा वरचे स्थान दिले जाणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पारंपरिक रिक्षाचालकांचा रोजगार सुरक्षित ठेवणे, त्यांना सामाजिक सुरक्षा देणे आणि त्यांच्या व्यवसायाला सक्षम करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांनी काही मंत्र्यांचे रॅपिडोशी आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर सरनाईक यांनी ‘राजकीय रंग देण्याऐवजी ठोस कागदपत्रे, पुरावे आणि तथ्ये सादर करा’, असे आवाहन केले. परिवहन विभागातील निर्णय हे नियम, कायदा आणि प्रवाशांच्या हिताच्या आधारावर घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राऊतांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळासोबत भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर सरनाईक यांनी आपण चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, रिक्षाचालकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ‘दै. सामना’च्या कार्यालयात येण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चा करताना ‘राजकीय हॉर्न’ कमी आणि वस्तुस्थितीचा ‘मीटर’ अधिक वापरूया, असा टोला सरनाईक यांनी राऊतांना लगावला. रिक्षाचालकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी परिवहन विभाग कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बाईक टॅक्सीच्या निर्णयावरून आता रिक्षाचालकांच्या रोजगाराचा मुद्दा, सरकारची भूमिका आणि रॅपिडोशी संबंधित आरोप यावरून संजय राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.