तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून हत्याकांड! एकाचा जीव घेतला, दुसऱ्याला मृत समजून फेकले

धाराशिवच्या तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत समीर पटेलचा मृत्यू झाला, तर अरबाज सय्यद गंभीर जखमी झाला. सहा जणांविरोधात गुन्हा दाखल.

Dharashiv_Crime_News

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन तरुणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष मारहाणीत समीर जब्बार पटेल या तरुणाचा मृत्यू झाला असून, अरबाज अफसर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी अरबाजवर धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

चहा पित असताना तरुणाला उचलले, शेतात नेऊन मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज अफसर सय्यद हा तुळजापूर शहरात चहा पीत बसला होता. त्यावेळी तिघांनी त्याला जबरदस्तीने वाहनात बसवून शिंदे महाराज यांच्या शेतात नेले. तेथे त्याच्या तोंडावर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड घेतला आणि मोबाईल तपासला. मात्र, मोबाईलमध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळली नसतानाही मारहाण सुरूच ठेवल्याचा आरोप अरबाजने केला आहे.

खिशातील 10 हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप

जखमी अरबाजच्या म्हणण्यानुसार, मारहाण करणाऱ्यांनी त्याच्या खिशातील 10 हजार रुपये काढून घेतले. तसेच, 'तू आमच्याच भागात कमावतोस आणि आमच्या मुलींना त्रास देतोस,' असा आरोप करत त्याला तब्बल दोन तास मारहाण करण्यात आली.

15 ते 20 जणांच्या टोळक्याकडून समीरला मारहाण; जागीच मृत्यू

यानंतर समीर जब्बार पटेल याला घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. तेथे 15 ते 20 जणांच्या टोळक्याने समीरला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या मारहाणीत समीरचा जागीच मृत्यू झाला. तर अरबाजलाही मृत समजून तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात आणून टाकण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, तो जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी अरबाजच्या अंगावरील गंभीर जखमांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी तुळजापूर पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, या घटनेमागील नेमके कारण आणि इतर संबंधित बाबींचा तपास केला जात आहे.

प्रेमप्रकरणाच्या संशयातून घडलेल्या या हिंसक घटनेमुळे तुळजापूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Inline Article Ad 728x90