पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार! 70 वर्षीय निवृत्त नागरिकाची 2 कोटी 10 लाखांची लूट
पुण्यातील मुंढवा परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिरातीद्वारे विश्वास संपादन करून सुरुवातीला चौपट परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवत आरोपींनी लाखो रुपये उकळले. याप्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून आता सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना लक्ष्य केले जात आहे. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून आणि त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे जाळ्यात ओढले
मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेले 70 वर्षीय नागरिक निवृत्त असून पुण्यातील मुंढवा परिसरात एकटेच राहतात. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून या फसवणुकीला सुरुवात झाली होती. सोशल मीडियावर त्यांना एका गुंतवणूक योजनेची जाहिरात दिसली. या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध उद्योगपती, केंद्रीय मंत्री आणि खेळाडूंचे फोटो वापरण्यात आले होते. तसेच गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.
जाहिरातीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपींनी संबंधित गुंतवणूक कंपनी यूकेस्थित असल्याचे सांगितले. सुरुवातीला 20 हजार रुपये गुंतवण्यास सांगून अवघ्या एका आठवड्यात चौपट परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले.
20 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळाले 80 हजार रुपये
तक्रारदारांनी आरोपींच्या सांगण्यावरून यूपीआयद्वारे 20 हजार रुपये पाठवले. त्यानंतर एका आठवड्यात त्यांच्या गुंतवणूक खात्यात 80 हजार रुपये जमा झाल्याचे दिसले. सुरुवातीला दिलेला परतावा पाहून त्यांचा आरोपींवर विश्वास बसला.
यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना सुरुवातीला पाच लाख रुपये आणि पुढे टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा गुंतवण्यास प्रवृत्त केले. या आमिषाला बळी पडून ज्येष्ठ नागरिकांनी मोठी रक्कम हस्तांतरित केली. यामध्ये त्यांनी एकाच वेळी 1 कोटी 7 लाख रुपये पाठवले. त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये तब्बल 2 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे दाखवण्यात आले.
मात्र, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यानंतरही आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.
डिजिटल अरेस्ट आणि ED अटकेची भीती दाखवली
दरम्यान, 2 जुलै रोजी तक्रारदारांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI चा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच तक्रारदारांचा मोबाइल क्रमांक एका गुन्ह्यात आढळल्याचा दावा केला.
याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचकडून लवकरच फोन येणार असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED कडून अटक होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली.
चौकशी पूर्ण होईपर्यंत पैसे जमा करावे लागतील आणि चौकशी संपल्यानंतर ही रक्कम परत केली जाईल, असे आरोपींनी तक्रारदारांना सांगितले. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आरोपींच्या सांगण्यावरून 8 ते 15 जुलै या कालावधीत आणखी 1 कोटी 4 लाख रुपये ट्रान्सफर केले.
आरोपी संपर्कातून गायब; पोलिसांत गुन्हा दाखल
अखेर आरोपींनी संपर्क बंद केला आणि गुंतवलेले पैसेही परत मिळाले नाहीत. त्यानंतर आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. गुंतवणुकीवर अवास्तव परताव्याचे आमिष आणि डिजिटल अरेस्टच्या धमक्यांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.