अग्निवीरांसाठी मोठा निर्णय! सैन्य दलात नोकरीची संधी आता 25 नव्हे, तर 75 टक्के तरुणांना; दोन वर्षांचा कार्यकाळही वाढणार?
अग्निवीर योजनेत केंद्र सरकारचा मोठा बदल! 75 टक्के अग्निवीरांना दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ आणि सैन्य दलात नियमित नोकरीची संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. अग्निवीरांच्या सैन्य दलातील कायमस्वरूपी भरतीच्या संधी 25 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधित अग्निवीरांचा कार्यकाळ आणखी दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगण्यात आले आहे.
अग्निवीरांच्या कार्यकाळात दोन वर्षांची वाढ
अग्निवीर योजनेच्या मूळ तरतुदीनुसार, चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 25 टक्के अग्निवीरांना नियमित सैन्य सेवेत सामावून घेण्याची तरतूद होती. मात्र, नव्या निर्णयानुसार उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना आणखी दोन वर्षांचा कार्यकाळ देण्याची घोषणा करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हा अतिरिक्त कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर संबंधित अग्निवीरांना सैन्य दलात नियमित सेवेत सामावून घेण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी अग्निवीरांची इच्छा आणि निवड प्रक्रियेतील पात्रता महत्त्वाची असणार आहे.
अग्निवीरांच्या वेतनातही होणार बदल?
दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांच्या वेतनातही बदल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अग्निवीरांना सैन्य दलात दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
अग्निवीरांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय
अग्निवीरांच्या आकांक्षा आणि सैन्य दलाची मनुष्यबळाची गरज यांचा समन्वय साधण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासोबतच महिलांनाही सैन्य दलातील विविध विभागांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अग्निवीर योजनेच्या माध्यमातून तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, मनोबल, तांत्रिक कौशल्य आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे या नव्या निर्णयाकडे अग्निवीरांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.