कांदिवलीत अमराठी रिक्षाचालकांचा राडा; मनसेचा थेट इशारा, ‘मराठी शिका नाहीतर मुंबई सोडा’
कांदिवली पश्चिमेत मराठी भाषेच्या सक्तीविरोधात अमराठी रिक्षाचालकांनी केलेल्या चक्का जाम आंदोलनानंतर वातावरण तापलं आहे. आंदोलनादरम्यान दगडफेक आणि मराठी रिक्षाचालकावर हल्ल्याचा आरोप झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत हिंदुस्तान नाका परिसरात थेट इशारा देणारा फलक लावला आहे.
Ai Generated
मुंबई : कांदिवली पश्चिमेत अमराठी रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य शासनाने टॅक्सी आणि रिक्षाचालकांना ग्राहकांशी व्यावहारिक संवाद साधण्यासाठी मराठी भाषेच्या वापराची सक्ती केल्याच्या विरोधात अमराठी रिक्षाचालकांनी सोमवारी कांदिवलीत चक्का जाम आंदोलन केलं. या आंदोलनानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.
कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड परिसरात, एकता नगरमधील नवीन म्हाडा टॉवरसमोर अमराठी रिक्षाचालक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांच्या आंदोलनामुळे लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली. याचा फटका सामान्य प्रवाशांना बसला.
आंदोलनादरम्यान दगडफेक, हल्ल्याचा आरोप
आंदोलनादरम्यान प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही रिक्षाचालकांना धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच एका मराठी रिक्षाचालकावर हल्ला केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही रिक्षांवर दगडफेक झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या काही व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
या प्रकारामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी अमराठी रिक्षाचालकांच्या कथित दादागिरीविरोधात तीव्र इशारा दिला आहे.
‘मराठी शिका, मराठीत बोला; नाहीतर मुंबई सोडा’
मनसेने कांदिवलीतील हिंदुस्तान नाका परिसरात एक जाहीर इशारा देणारा फलक लावला आहे. ‘रिक्षाचालकांनी मराठी शिकावी आणि मराठीतच बोलावं. मराठी शिकण्यास आणि बोलण्यास कचरत असाल तर मुंबईतून परत निघून जा’, असा मजकूर या फलकावर आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या नावाखाली मुंबईकरांना वेठीस धरणं खपवून घेतलं जाणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मराठी रिक्षाचालकावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दिनेश साळवी यांनी संताप व्यक्त करत, अमराठी रिक्षाचालकांची दादागिरी सहन केली जाणार नसल्याचं म्हटलं आहे. गरज पडल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कांदिवलीत तणावाची शक्यता
आंदोलन, त्यानंतर मनसेकडून लावण्यात आलेले इशारे आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे कांदिवली पश्चिमेत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.
आता या वादावर प्रशासन काय भूमिका घेतं आणि रिक्षाचालकांच्या आंदोलनानंतर पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागलं आहे.