बुलढाण्यात सराफा व्यापाऱ्याच्या अपहरणाने खळबळ! तपासात मोठा खुलासा; अपहरणकर्ते निघाले तेलंगणा पोलीस

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे योगीराज ज्वेलर्सचे मालक अनिरुद्ध शिंगणे यांचे दिवसाढवळ्या इनोव्हा कारमधून अपहरण झाल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला असून, अपहरणकर्ते तेलंगणा पोलीस असल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना माहिती का देण्यात आली नाही, याचा तपास सुरू आहे.

Buldhana_Kidnapping Case

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या सराफा व्यापाऱ्याच्या अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. योगीराज ज्वेलर्सचे मालक आणि देऊळगाव (मही) येथील रहिवासी अनिरुद्ध शिंगणे (वय 28) यांना तहसील कार्यालयासमोरून इनोव्हा कारमधून आलेल्या चार जणांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली. दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले असून, संबंधित व्यक्ती तेलंगणा पोलीस असल्याची माहिती समोर आली आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

घटनेनंतर अनिरुद्ध शिंगणे यांच्या नातेवाईकांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये अपहरणासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार कैद झाली होती.

अनिरुद्ध शिंगणे हे सराफा व्यवसायासोबतच बांधकाम व्यवसायातही कार्यरत असल्याने त्यांच्या अपहरणामागील कारणांचा शोध पोलीस घेत होते. अवघ्या काही तासांत पोलिसांनी संशयित इनोव्हा कारचा शोध लावला.

लव्हाळा फाट्यावर इनोव्हा कार आढळली; व्यापारी सुरक्षित

तपासादरम्यान साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लव्हाळा फाटा येथे संबंधित इनोव्हा कार आढळून आली. देऊळगाव राजा पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. त्यानंतर अनिरुद्ध शिंगणे हे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

मात्र, या संपूर्ण प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. अनिरुद्ध शिंगणे यांना ताब्यात घेणारे व्यक्ती हे तेलंगणा पोलीस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

तेलंगणा पोलिसांनी स्थानिक पोलिसांना माहिती का दिली नाही?

तेलंगणा पोलिसांनी अनिरुद्ध शिंगणे यांना नेमक्या कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतले होते, तसेच त्यांना तेलंगणात का घेऊन जात होते, याबाबत स्थानिक पोलीस आणि जिल्हा पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, तेलंगणा पोलिसांनी स्थानिक पोलिसांना माहिती न देता ही कारवाई का केली, याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, संबंधित तेलंगणा पोलीस कर्मचारी आणि अनिरुद्ध शिंगणे हे पोलिसांच्या ताब्यात असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनीही या घटनेला दुजोरा देत पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली.

या घटनेमुळे देऊळगाव राजा शहरात चर्चांना उधाण आले असून, तेलंगणा पोलिसांच्या कारवाईमागील नेमके कारण काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90