धुळ्यात बँकेच्या कारभाराला वैतागून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; पीक कर्जासाठी तीन महिन्यांपासून प्रतीक्षा
धुळे जिल्ह्यातील बोरिस येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पीक कर्ज मंजूर होत नसल्याने एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिंचवार येथील हिरालाल उत्तम माळी यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करूनही तीन महिने बँकेत हेलपाटे मारावे लागल्याचा आरोप केला आहे. अखेर बँकेच्या प्रवेशद्वारावर त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित खातेदारांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या घटनेमुळे बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

धुळे : पीक कर्जासाठी तीन महिने बँकेत चकरा मारूनही कर्ज मंजूर होत नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. बोरिस येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चिंचवार येथील ४४ वर्षीय शेतकरी हिरालाल उत्तम माळी यांनी पीक कर्ज मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती बँकेत सादर केली होती. मात्र, तीन महिने उलटूनही कर्ज मंजूर होत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. वारंवार बँकेत जाऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं?
सततच्या बँक हेलपाट्यांना आणि कर्ज मंजुरीतील विलंबाला वैतागलेल्या हिरालाल माळी यांनी बँकेच्या प्रवेशद्वारावर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी उपस्थित असलेल्या बुरझड, निकुंबे आणि बोरिस येथील खातेदारांनी तातडीने हस्तक्षेप करत त्यांना रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर उपस्थित खातेदारांनी बँकेच्या कामकाजावर आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना तीन-तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवावे लागत असतील, तर बँक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा शेतकऱ्याने केला उल्लेख
या घटनेनंतर हिरालाल माळी यांनी आपली व्यथा मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकऱ्यांना कर्जाबाबत दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख केला. मागील कर्जाचा बोजा शासनाकडून कमी करण्याचे आश्वासन दिले जात असेल आणि नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांना सूचना केल्या जात असतील, तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बँकेच्या कारभारात आपली काही चूक असेल तर त्याची चौकशी करून कारवाई करावी; मात्र बँक प्रशासनाची चूक असेल तर संबंधितांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बँक प्रशासनावर कारवाई होणार का?
या घटनेमुळे पीक कर्ज वितरण प्रक्रियेतील विलंब आणि शेतकऱ्यांना करावा लागणारा मानसिक त्रास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शेतकरी हिरालाल माळी यांना न्याय मिळणार का? तसेच संबंधित बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी होऊन कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.