शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! 73 लाख शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत; 4.86 लाखांना कर्जमाफीचा लाभ

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची दिवाळी भेट! 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपयांची मदत जमा, तर 4.86 लाख शेतकऱ्यांना 4,764 कोटींची कर्जमाफी वितरित.

Devendra-Fadnavis

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जाहीर केलेली 5 हजार रुपयांची अग्रीम दुष्काळ मदत थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असून, पुढील दोन दिवसांत जवळपास 95 टक्के शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा

राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीपूर्वी ही मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्यानुसार आतापर्यंत 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने मदत जमा होण्यास विलंब होत आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत बहुतांश पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

4.86 लाख शेतकऱ्यांना 4,764 कोटींची कर्जमाफी

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने आणखी 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 4,764 कोटी रुपये जमा केले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 76 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जवळपास 21 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात आले असून, यासाठी सुमारे 19 हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्यांचे प्रमाणीकरण सुरू असून, प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही रक्कम जमा केली जाणार आहे.

शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर काय म्हणाले फडणवीस?

यावेळी राज ठाकरे यांच्या आंदोलनाबाबतच्या प्रतिक्रियेवरही फडणवीस यांनी भाष्य केले. सरकारचे मोर्चे हे अराजकतेच्या विरोधात आणि संविधानाच्या संरक्षणासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही आणि संविधानाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याचे आवाहन केले. ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील एफआरपी आणि अतिरिक्त दराच्या मागणीवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारची भूमिका मध्यस्थाची असून, आंदोलन शांततेत संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनाही मध्यस्थी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Inline Article Ad 728x90