MPSC विद्यार्थ्यांचा उद्रेक योग्यच! फडणवीसांचा मोठा निर्णय; 2025 च्या मुख्य परीक्षेच्या पेपरचं होणार रिचेकिंग?
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या पेपरच्या पुनर्तपासणीसह चौकशी आणि SIT संदर्भातील मागण्या मान्य करत पुढील आठ दिवसांत कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसेच 21 सप्टेंबरपासून होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलल्या जाण्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
मुंबई : MPSC परीक्षेच्या कारभारावरून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीला अखेर मोठं वळण मिळालं आहे. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. मात्र, या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे MPSC प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
MPSC संदर्भात गेल्या काही काळात घडलेल्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा उद्रेक होणं योग्यच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अनेक गोष्टी वेळच्या वेळी करण्याची गरज होती, मात्र त्या झाल्या नाहीत. त्यामुळे परिस्थिती निर्माण झाली असून, आता या माध्यमातून संपूर्ण व्यवस्था सुधारण्याची संधी मिळाली आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
'पुरावा असेल तर कारवाई करायला तयार'
विद्यार्थ्यांकडे गैरप्रकारासंदर्भात कोणतेही पुरावे असतील तर त्यावर कारवाई करण्यास सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. न्याय देण्यासाठी कोणतीही बाब लपवून ठेवता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
रिचेकिंग, चौकशी आणि SIT स्थापन करण्यासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरही सकारात्मक भूमिका घेतल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या पेपरच्या पुनर्तपासणीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
पुढील परीक्षा 100 टक्के पारदर्शक?
MPSC ची पुढील परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्याचं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांवर संबंधित पातळीवर पुढील आठ दिवसांत कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, 21 सप्टेंबरपासून होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहितीही विद्यार्थ्यांनी दिली आहे. तसेच व्ही. राधा समितीसमोर विद्यार्थ्यांनी आपले सर्व मुद्दे मांडावेत, असं सांगण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं.
विद्यार्थ्यांचा दावा — 100 टक्के मागण्या मान्य
मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाली असून, विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्या मान्य करण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 संदर्भातील रिचेकिंग, चौकशी, SIT आणि इतर मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय मिळाल्याने विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
आता या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते आणि पुढील आठ दिवसांत सरकारकडून कोणती पावलं उचलली जातात, याकडे MPSC विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.